पुणे – होर्डिंग उभारण्याकरिता ‘वर्क ऑर्डर’च्या करारनाम्यावर स्वाक्षरी करण्यासाठी एक लाख १८ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष अॅड. नितीन ज्ञानेश्वर लांडगे यांच्यासह पाच जणांना न्यायालयाने शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सत्र न्यायाधीश एस. बी. हेडाऊ यांनी हा आदेश दिला.
नितीन लांडगे यांच्यासह त्यांचे स्वीय सहायक आणि मुख्य लिपिक ज्ञानेश्वर किसन पिंगळे, लिपिक विजय शंभुलाल चावरिया, शिपाई अरविंद भीमराव कांबळे आणि संगणक ऑपरेटर राजेंद्र जयवंत शिंदे यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपींवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ आणि भारतीय दंड विधान कायद्यानुसार पिंपरी-चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत २४ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे.
तक्रारदारांचा जाहिरातीचा व्यवसाय आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत विविध २८ ठिकाणी होर्डिंग उभारण्यासाठी त्यांनी भरलेल्या निविदा मंजूर झाल्या असून, त्याची ‘वर्क ऑर्डर’ अद्याप निघालेली नाही. त्यामुळे तक्रारदार स्थायी समितीचे अध्यक्ष लांडगे आणि त्यांचे स्वीय सहायक पिंगळे यांना भेटले. त्या वेळी ‘वर्क ऑर्डर’च्या करारनाम्यावर स्वाक्षरी करण्यासाठी निविदेच्या तीन टक्के रक्कम म्हणजे दहा लाख रुपयांची लाचेची मागणी आरोपींनी तक्रारदारांकडे केली.
त्यापैकी बुधवारी सहा करारनाम्याच्या फाइलवर स्वाक्षरी व शिक्का देण्यासाठी दोन टक्क्यांप्रमाणे एक लाख १८ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचून आरोपींना ही लाच स्वीकारताना ताब्यात घेतले. स्थायी समितीच्या बैठकीनंतर महापालिकेत ही कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे.