अहमदाबाद – गुजरातमधील सुरत जिल्ह्याला शनिवारी मध्यरात्रीच्या सुमाराला 3.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. भूकंपाचा केंद्रबिंदू सूरतपासून सुमारे 27 किलोमीटर अंतरावर दक्षिण-पश्चिम दिशेवर होता असे भुकंप मापन व अंदाज केंद्राकडून सांगण्यात आले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्याने सांगितले की, या भुकंपाचा केंद्र बिंदु भुगर्भात 5.2 किलोमीटर खोलीवर होता.
भूकंपामुळे कोणतीही मालमत्ता किंवा जीवित हानी झाली नाही. रात्री 12 वाजून 52 मिनीटांनी हा धक्का बसला. त्यामुळे नागरीकांमध्ये मात्र मोठीच घबराट निर्माण झाली होती. गुजरात हे मोठे भुकंप प्रवण राज्य मानले जाते. या राज्याला दीर्घकाळापासून ठराविक अंतराने भूकंपाचे मोठे धक्के बसत आले आहेत.
या आधीचा सर्वात मोठा धक्का या राज्याला सन 2001 साली बसला होता. त्यावेळी कच्छ भागात झालेला हा भूकंप गेल्या दोन शतकांमध्ये भारतातील तिसरा सर्वात मोठा आणि दुसरा सर्वात विनाशकारी भूकंप होता, ज्यात 13,800 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आणि 1.67 लाख लोक जखमी झाले. दरम्यान, टर्की आणि सिरियात नुकत्याच झालेल्या भूकंपामुळे मोठा नरसंहार झाला आहे. त्यामुळे भूकंप म्हटलं की नागरिकांचा थरकाप उडत आहे.