कोपर्डे हवेली – सह्याद्री कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभ व सह्याद्री कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इमारतीच्या उद्घाटनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे यशवंतनगर ता. कराड येथील कारखाना कार्यस्थळावर आगमन होणार होते. त्यांचे हेलिकॉप्टर हवेत भिरक्या घेत असतानाच अनेक नागरिकांनी तिकडे धाव घेत हेलिपॅडवर भिरभिरणाऱ्या हेलिकॉप्टरवर आपल्या नजरा रोखून धरल्या होत्या.
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चाललेल्या अनेक घडामोडींमुळे या सभेला उपस्थित राहण्यासाठी अनेकजण आतुर झाले होते. शरद पवार यांचे कारखाना स्थळावर येणे काही नवीन नाही. पण ते जेव्हा-जेव्हा येतात तेव्हा काही ना काही सस्पेन्स असतो, हेही तितकेच खरे आहे. शरद पवार यांचे कट्टर समर्थक व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू सहकारी अशी आ. बाळासाहेब पाटील यांची प्रतिमा सर्वपरिचित आहे.
आ. पाटील यांच्या आमदारकीच्या पंचविशीत मंत्रिपद मिळाल्यास हा सुवर्णयोग ठरणार आहे. आजचा कार्यक्रम त्यांच्या राजकीय कारकिर्दीसाठी नक्कीच शुभसूचक ठरवणारा होता. त्यामुळेच या कार्यक्रमासाठी खा. शरद पवार यांचे नाव निश्चित झाल्यानंतर आ. पाटील यांच्या कार्यकर्त्यांच्या मनात उत्कंठा शिगेला पोहोचली होती. त्यातच सध्या सुरू असलेले राजकारणातील चक्रीवादळ आणि अशा परिस्थितीत खंबीरपणे उभे असलले खा. शरद पवार. या सर्वांमुळेच त्यांना पाहण्यासाठी हेलिपॅडवर सर्वांच्या नजरा खिळून होत्या.