शरद पवार; दिमाखदार सोहळ्यात यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान
कराड – संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमुळे परिचित असलेल्या प्रा. एन. डी. पाटील यांचे पुरोगामी चळवळीतील स्थान मोठे आहे. समाजाच्या परिघावरील किंवा परिघाबाहेरील माणसांच्या कल्याणासाठी असलेल्या परिवर्तनवादी चळवळीत एन. डीं.चा सिंहाचा वाटा आहे. अशा या ध्येयवादी व्यक्तीची प्रतिष्ठानने पुरस्कारासाठी केलेली निवड योग्य असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले.
मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात येणारा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांना शरद पवार यांच्या हस्ते कराड येथील सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालयाच्या प्रांगणातील शानदार सोहळ्यात सोमवारी प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे वितरण प्रथमच कराडमध्ये करण्यात आले. खा. श्रीनिवास पाटील, आ. बाळासाहेब पाटील, सौ. सरोजताई पाटील, कल्लाप्पाणा आवाडे, डॉ. अनिल पाटील, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, आगामी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष व प्रसिद्ध दिग्दर्शक जब्बार पटेल, राम खांडेकर, दिलीप माजगावकर, प्रभाकर देशमुख, प्राचार्य डॉ. मोहन राजमाने, शरद काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
खा. पवार म्हणाले, यशवंतराव चव्हाणांचे कर्तृत्व देशभर बहरले. त्यांच्याबद्दल कृतज्ञतेची भावना आपल्या मनात सदैव राहील. त्यांच्या विचाराने प्रेरित झालेल्या प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी चळवळीच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले. समाजासाठी झटणाऱ्या नेमक्या व्यक्तीची दखल प्रतिष्ठानने घेतली आहे.
प्रा. डॉ. एन. डी. पाटील म्हणाले, यशवंतराव चव्हाणांच्या विचारांवर महाराष्ट्राची भिस्त आहे. उत्तम वाचक असलेल्या साहेबांनी आयुष्यभर हजारो ग्रंथाची कमाई केली. आजही समाजाला त्यांच्या विचारांची गरज आहे.
रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आज खेडोपाडी ज्ञानगंगा पोहोचली आहे. ही मातृसंस्था असून मी नेहमीच तिच्या ऋणात राहीन. यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने दिलेला हा पुरस्कार माझ्यासाठी सर्वांत मोठा पुरस्कार आहे. यावेळी राम खांडेकर यांच्या “सत्तेच्या पडछायेत’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषक विजेते अभिजित बॅनर्जी यांना प्रतिष्ठानकडून 2020 सालचा पुरस्कार देण्यात येणार असल्याचे डॉ. अनिल काकोडकर यांनी जाहीर केले. उपाध्यक्ष अरुण गुजराथी यांनी प्रास्ताविक केले. शरद पानसे यांनी आभार मानले.
पुरस्काराच्या रकमेतून दोन संस्थांना देणगी
प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी या पुरस्काराच्या दोन लाख रुपयांच्या रकमेतून एक लाख रुपये रयत शिक्षण संस्थेस व एक लाख रुपये इचलकरंजीतील वाचनालयास देणगी म्हणून दिले.