पिंपरी – शहरात 1 जुलैपासून पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. अशा परिस्थितीत शहरातील डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. जुलै महिन्यातील अवघ्या 14 दिवसांमध्ये डेंग्यूचे 256 संशयित, तर 16 बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नागरिकांनी घराच्या, कार्यालयाच्या परिसरात पाणी साठणार नाही, याची काळजी घ्यावे, असे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने केले आहे.
जून महिन्यात डेंग्यूचे 297 संशयित तर, 17 बाधित रुग्ण आढळले होते. जुलै महिन्यात 14 तारखेपर्यंत 1 हजार 982 रूग्ण तापाचे आढळून आले आहेत. यामध्ये डेंग्यूचे 256 संशयित तर 16 बाधित रुग्ण आढळले आहेत. चिकनगुनियाचे तीन संशयित रूग्ण आढळले आहेत. पावसाळ्याच्या कालावधीत डासांची उत्पत्ती होण्यास पोषक वातावरण असते.
डासांमुळे हिवताप, डेंग्यू आणि चिकुनगुनिया हे आजार पसरतात. हिवताप हा आजार पसरविण्यास अनॉफिलस डास तर, डेंग्यू आणि चिकुनगुनिया हे आजार पसरविण्यास एडिस इजिप्ताय हे डास कारणीभूत ठरतात. हिवताप, डेंग्यू किंवा चिकुनगुनिया झालेल्या व्यक्तीस डास चावला तर रोग्याच्या रक्तातील हिवताप, डेंग्यू, चिकुनगुनियाचे विषाणु त्या डासाच्या शरीरात शिरतात. असा विषाणुजन्य डास निरोगी माणसाला चावल्यास त्याला हिवताप, डेंग्यू, चिकुनगुनिया होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे या रोगाचा प्रसार थांबवायचा असल्यास एनॉफिलस व एडिस डासांच्या उत्पत्तीवर आळा घालावा लागतो.
डेंग्यूची लक्षणे
तीव्र ताप, तीव्र डोकेदुखी, स्नायूदुखी व सांधेदुखी, उलट्या होणे, डोळ्यांच्या आतील बाजूस दुखणे, अंगावर पुरळ, अशक्तपणा, भूक मंदावणे, तोंडाला कोरड पडणे, त्वचेखाली,नाकातून रक्तस्राव होणे व रक्ताची उलटी होणे, रक्तमिश्रीत, काळसर रंगाची शौचास होणे, पोट दुखणे, रक्तदाब कमी होणे, हातपाय थंड पडणे आदी.
नागरिकांनी पाणी साठविण्याच्या भांड्यातील पाणी वापरून रिकामी करून घासून पुसून कोरडी करावी. त्यानंतर त्यात पुन्हा पाणी भरावे. घरातील ज्या मोठ्या पाण्याच्या टाक्या रिकाम्या करता येणार नाहीत त्यांना घट्ट झाकण बसवावे. घराच्या अंगणात किंवा गच्चीवर असलेल्या भंगार मालाची विल्हेवाट लावावी. घराभोवती पाण्याची डबकी असतील तर ती बुजविणे किंवा संबंधित ठिकाणी पाणी वाहते केले जाईल, याची दक्षता घ्यावी.
डॉ. पवन साळवे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी