चूल आणि मूल “एप्रिल फूल’ (भाग ३)

प्रा. शैलेश कुलकर्णी

आपल्या प्रत्येकाला जगण्यापलीकडचं जीवन अधिक आनंद देत असतं. ह्या आनंदात आपण आत्मकेंद्रित झालो, तर मात्र इतरांच्या बाबतीतल्या आपल्या जाणिवाच संपुष्टात येण्याची शक्‍यता असते. आयुष्यात दुसऱ्यांसाठी, खरं तर, करण्यासारखं खूप काही असत; पण आपलंच तिकडे लक्ष नसतं. आनंदातिरेकानं काही वेळा आपल्याला जगाचा, इतरांचा विसर पडतो, पण दु:खाच्या वेळी मात्र प्रत्येकाच्या आठवणी आल्याशिवाय आपला एकही क्षण जात नाही. कोणालाही एखाद्याच्या दु:खापेक्षा सुखात सहभागी व्हायलाच आवडत असतं. सद्य:स्थितीत तर ह्या व्हर्च्युअल जगात रममाण झालेल्या व्यक्ती फेसबुकवरील तुमच्या पोस्टला कदाचित लाईक करतीलही, पण ती पोस्ट शेअर करतीलच असं नाही, अथवा त्यावर कॉमेंट करतीलच असंही नाही. आपणही अनेकदा ट्‌विट करण्याऐवजी क्‍विट करणं अधिक पसंत करतो, योग्य समजतो. का ? काय कारण असू शकेल बरं ? आपापसातील गोष्टी शेअर करण्यातून परस्परांची केअर केल्याची प्रचीती येते, काही वेळा बेअर देखील करावं लागतं; तरच कोणालाही डेअर करताना आश्‍वासक वातावरणाची अनुभूती येत असते. ह्यांपैकी खरंच आपण काय काय करतो? ह्याची गरज नसते का? ह्या सर्वच बाबींची अभ्यासपूर्वक जाणीव करून घेण्याची जरुरी असते.

दिल्यामुळे असं होतं का?

प्रत्येक अनुचित घटना ह्या “ती” च्याच बाबतीत घडतात आणि घटनेविरुद्ध निषेध नोंदवण्यासाठी मेणबत्त्या पेटत राहतात. तिच्या काळजीपेक्षा त्या मेणबत्त्या पसरवत असलेल्या काजळीत आपण धन्यता मानत राहतो. प्रत्येक पीडितेला न्याय मिळतोच असं नाही आणि घडलेल्या घटनेतून काही बोध घेऊन तशाच घटनेची पुनरावृत्ती होणार नाही, असंही नाही. म्हणजे ही जाणिवांचीच उणीव म्हणावी लागेल. अर्थात, स्त्रीचं कर्तव्य आणि कौटुंबिक जबाबदारी म्हणून तिनं चूल-मूल सांभाळणे एक वेळ ठीक आहे. परंतु तिच्यावर त्याची भूल घातल्याप्रमाणे तिची अवस्था होणं कितपत योग्य आहे, ह्याचाही गांभीर्यानं विचार होणं जरुरीचं आहे. अशी अवस्था न होण्यासाठी समाजमनातूनच काही तरी व्यवस्था होणं गरजेचं आहे. अनेक ठिकाणी केवळ चूल-मूलच्या कचाट्यातून तिची सुटका होऊ दिली जात नाही. तिला तिचं शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक पातळीवरील काम दुर्लक्षित करावं लागतं. तिला ह्याच कारणानं प्रत्येक बाबतीतील प्राधान्य बाजूला सारून सामान्यच राहावं लागतं. चूल, मूल ह्यांपैकी मूल तिचं अपत्य असतं-निश्‍चितच आपत्ती नसते, त्यासाठी देखील कायद्यानं, नियमानुसार पुरेसा कालावधी तिच्या अपत्याच्या संगोपनासाठी मिळत असतो. चूल मात्र तिला चुकत नाही, कारण घरातल्या कायद्यात चुलीचा कायदा चुलीत घालणारी मानसिकता बदलतच नाही.

एकूण काय – एप्रिल फूल

एकाच स्त्रीला अनेक पात्रांच्या भूमिका एकाच वेळेस साकारायच्या असतात. कधी बहीण, पत्नी, जाऊ, नणंद, मैत्रीण, आई, आजी, मावशी, आत्या, काकू इत्यादी सर्व घराशी, कुटुंबाशी संबंधित तर, सल्लागार, मार्गदर्शक, शिक्षिका, लेखिका, डॉक्‍टर, पत्रकार, अधिकारी वगैरे भूमिका तिला घराबाहेर अगदी तंतोतंत साकारायच्या असतात. प्रत्येक भूमिका साकारताना तिला चूलमूल दुर्लक्षित करून चालत नाही. तिला तिच्या आयुष्यातील सर्वच नाती जपायची असतात, ती टिकवून ठेवावी लागत असतात. घरी काय किंवा दारी काय “ती” ला फूल समजणारे आणि नेहमीच एप्रिल फूल करणारे एकूणच संख्येनं काही कमी नसतात. तिच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा 1 एप्रिलसारखाच एप्रिल फूल करणारा असतो. एकीकडे तिचं तोंडभर कौतुक केलं जातं, की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. दुसरीकडे मात्र तिच्या अकलेवर शंका घेतली जाते, तिच्यावर टीकास्त्र सोडलं जातं. कायमच तिला फूल करणारे, समजणारे अति शहाणेच असतात, असं म्हंटलं तर मात्र त्यांचा आक्रस्ताळेपणा हा कर न भरता करमणूक करणारा ठरतो.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.