इस्लामाबाद – पाकिस्तानच्या खैबर पख्तुन्वा प्रातातील दासू धरणाचे काम करत असलेल्या चिनी कंपनीने हे काम स्थगित करत असल्याचे आज सांगितले. या धरणाच्या कामाच्या ठिकाणी झालेल्या स्फोटात या कंपनीचे काही इंजिनिअर ठार झाले होते. म्हणून सुरक्षिततेच्या कारणास्तव हे काम थांबवत असल्याचे “सीजीजीसी दासू एचपीपी’ कंपनीने म्हटले आहे.
बुधवारी खैबर पख्तुन्वा प्रातातील कोहिस्तान जिल्ह्यात एका प्रवासी बसमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. त्यामध्ये 13 जण ठार झाले होते. मृतांमध्ये 9 चिनी इंजिनिअरचाही समावेश होता. धरणाच्या कामासाठी दासू येथे जात असताना या बसमध्ये स्फोट झाला होता.
या स्फोटामुळे कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे दासू होयड्रोपॉवर प्रोजेक्टचे काम थांबवावे लागत आहे, असे कंपनीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर अंतर्गत दासू धरणावर हा जलविद्युत प्रकल्प उभारण्यात येत आहे.
पाकिस्तानमध्ये झालेल्या या दहशतवाद हल्ल्यामागील व्यक्तींना शिक्षा करावी, अशी मागणी चीनच्यावतीने शुक्रवारी पाकिस्तानकडे करण्यात आली. चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांनी यासंदर्भात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडे फोनवरून हा मुद्दा उपस्थित केला आहे. या घटनेतील जबाबदार दोषींना शिक्षा करण्याच्या मुद्द्यावर केकियांग यांनी विशेष भर दिला.
या स्फोटाच्या कारणांचा तपास करण्यासाठी उच्चस्तरिय तपास पथक नियुक्त करण्यात आले असल्याचे पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशिद अहमद यांनी सांगितले. या स्फोटाचा तपास करण्यासाठी चीनचे 15 सदस्यांचे पथकही पाकिस्तानमध्ये दाखल झाले आहे.