उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होऊन चार दिवसांचा कालावधी लोटला तरी चिंचवड विधानसभा मतदारसंघात अद्याप एकाही उमेदवारांने अर्ज दाखल केला नाही. मंगळवारी आणखी 15 इच्छुकांनी 31 अर्ज विकत घेतले आहेत. यामुळे या मतदारसंघात मंगळवार अखेरपर्यंत एकूण 39 इच्छुकांनी 85 उमेदवारी अर्ज विकत घेतले आहेत.
उमेदवारी अर्ज भरण्याचा अद्याप श्रीगणेशा झालेला नाही. दोन दिवसांत केवळ उमेदवारी अर्ज खरेदीसाठीच इच्छुक गर्दी करीत असल्याचे पहायला मिळत आहे. भाजपकडून अधिकृत रित्या विद्यमान वर्तमान लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी जाहीर झालेली असतानाही नगरसेवक संदीप बाळकृष्ण वाघेरे यांनी भाजपकडून अर्ज विकत घेतला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून पालिकेचे विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, विशाल वाकडकर यांनी अर्ज घेतले आहेत. तर कॉंग्रेसकडून संदेशकुमार नवले यांनी अर्ज घेतले आहेत.