शिवसेना-भाजप नेत्यांच्या निर्णयानुसारच जागावाटप – शिवतारे

कोल्हापुरात शिवसेनेला 6 जागांचे स्पष्टीकरण

पुणे – ज्या पक्षाचा आमदार आहे, त्याच पक्षाला ती जागा असेल, असे जागा वाटपाचे सूत्र ठरले आहे. त्यानुसार पुण्यात शिवसेनेला एकही जागा मिळू शकली नाही. तर कोल्हापूर येथे शिवसेनेला सहा जागा मिळाल्याचे आहे. त्याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी घेतलेल्या निर्णयानुसार हे जागावाटप झाल्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

युतीच्या जागा वाटपात पुण्यातील एकही जागा शिवसेनेला मिळाली नाही. त्यामुळे सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. अनेकजण बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर शिवतारे बोलत होते. “पक्षाने माझ्याकडे पुण्याची जबाबदारी दिली नसल्यामुळे मी लक्ष घातले नाही. जबाबदारी दिली असती तर वेगळी गोष्ट झाली असती. “मातोश्री’वर नाराज शिवसैनिकांची समजूत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काढत असून, नक्‍कीच शिवसैनिकांची नाराजी दूर होईल,’ असा विश्‍वास शिवतारे यांनी व्यक्‍त केला.

यावेळी स्वत:च्या उमेदवारीविषयी ते म्हणाले, “मी पुरंदर विधानसभा मतदारसंघाचा विद्यमान आमदार आहे. ती माझी हक्‍काची जागा आहे. ती मला देऊन कोणी उपकार केले नाही,’ असा टोला विजय शिवतारे यांनी नाव न घेता भाजपला लगावला. तसेच यंदाही पुरंदरमधून भरघोस मतांनी निवडून येतो की नाही, ते अजित पवार यांना दि. 24 ऑक्‍टोबरला कळेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूडमधील उमेदवारीबद्दल शिवतारे म्हणाले, “देशातील नागरिक कोठूनही निवडणूक लढवू शकतो. तो त्याचा हक्‍क असून त्यानुसार पाटील यांना कोथरूडमधून उमेदवारी देण्यात आली आहे. या निवडणुकीत महायुतीने दिलेल्या उमेदवाराचे काम कार्यकर्ते एकदिलाने करतील.’

Leave A Reply

Your email address will not be published.