पिंपरीत आणखी 22 इच्छुकांची भर
आजी-माजी आमदारांसह 74 जणांनी घेतले 175 अर्ज
पिंपरी – शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघांसाठी मंगळवारपर्यंत एकूण 154 इच्छुकांनी 351 अर्ज नेले आहेत. परंतु, अर्ज केवळ दोनच उमेदवारांनी दाखल केले आहेत. भोसरी आणि पिंपरी मतदारसंघातून प्रत्येकी एका उमेदवाराने अर्ज दाखल केला आहे. यामुळे इच्छुकांची संख्या पाहता गुरुवारी आणि शुक्रवारी अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
पिंपरी विधानसभेसाठी आज एकाही उमेदवाराने अर्ज भरलेला नाही. मात्र, दिवसभरात 22 उमेदवारांनी 54 अर्ज नेले. यामुळे पिंपरी विधानसभेत एकूण 74 जणांनी घेतले 175 अर्ज नेले आहेत. विद्यमान आमदार ऍड. गौतम चाबुकस्वार यांनी शिवसेनेकडून अर्ज नेला आहे. माजी आमदार अण्णा बनसोडे यांनीही अर्ज नेला आहे, मात्र त्यांनी कोणत्याही पक्षाचा किंवा अपक्ष म्हणून अर्ज नेताना उल्लेख केलेला नाही.
बुधवारी (दि. 2) सुट्टी असल्याने आता उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी गुरूवार आणि शुक्रवार हे दोन दिवसच शिल्लक राहणार आहेत. प्राधिकरण येथील डॉ. हेडगेवार भवन येथे पिंपरी विधानसभेसाठी अर्ज वाटप व स्वीकृती सुरू आहे. शुक्रवारी अर्ज वाटप आणि स्वीकृतीचा शेवटचा दिवस असणार आहे. त्या दिवशी सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत हे कामकाज चालेल. तर, शनिवारी (दि.5) सकाळी 11 वाजता अर्जांची छाननी होणार आहे.
भाजप-शिवसेना युतीची घोषणा झाल्यानंतर आज आमदार ऍड. चाबुकस्वार यांनी शिवसेनेकडून अर्ज नेला. युतीची घोषणा झाल्यानंतरही भाजपतर्फे मंगल वाळुंजकर, लालासाहेब गायकवाड यांनी अर्ज नेले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून उत्तम कांबळे, संदीपान झोंबाडे तर, कॉंग्रेसतर्फे बाबासाहेब बनसोडे यांनी अर्ज घेतला. मनसेतर्फे राजू भालेराव, किसन कांबळे हे अर्ज घेतले आहेत. तर, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ऍड. राजरत्न शीलवंत, प्रवीण ऊर्फ बाळासाहेब गायकवाड यांनी अर्ज नेले आहेत.