पिंपरी, (प्रतिनिधी) – आध्यात्मिक आणि पौराणिक वारसा लाभलेल्या चिंचवडगावाची आता एक नवीन ओळख बनत आहे. श्रीमन महासाधू मोरया गोसावींचे समाधीस्थळ आणि प्राचीन मंदिरे अशी ओळख असलेल्या चिंचवडमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये पूजा सामग्री व्यवसाय वाढीला लागला आहे.
गेल्या दोन ते तीन वर्षांमध्ये या व्यवसायांची संख्या दुप्पट झाली आहे. कोणत्याही पूजा, अनुष्ठान अथवा धार्मिक कार्यासाठी लागणारी सामग्री हवी असल्यास भाविक चिंचवडकडे धाव घेतात. केवळ शहरातील नव्हे तर आसपासच्या ग्रामीण भागातील भाविक आणि लहान दुकानदार येथूनच खरेदी करत असल्याचे दिसून येत आहे.
हिंदू धर्मात मूल जन्मल्यापासून ते मृत्यूपर्यंत वेगवेगळे धार्मिक संस्कार सांगण्यात आले आहेत. या सर्व प्रसंगासाठी विविध धार्मिक विधी करण्यात येतात. या विधींसाठी लागणारी सर्व प्रकारची पूजा सामग्री चिंचवडमध्ये नक्की मिळणार असा भाविकांना विश्वास आहे. जन्मापासून ते अंत्यविधीपर्यंत पूज अथवा विधीसाठी लागणारी सर्व सामग्री, धार्मिक साहित्य, सहजपण उपलब्ध होणारी एक बाजारपेठ श्री मोरया गोसावी मंदिर परिसराला घेरून तयार झालेली आहे.
सकाळी ८ ते रात्री ९ या कालावधीत बाजरपेठेतील दुकाने चालू असतात. श्री मोरया गोसावींचे दर्शन घेण्यासाठी परगावाहून येणारा भाविक दर्शन घेतलं की, पूजाअर्चेसाठी लागणारे साहित्य, धार्मिक ग्रंथ, यज्ञकुंडे, यज्ञाला लागणारी हवन सामग्री, देव- देवतांच्या प्रतिमा, मूर्ती घेण्यासाठी साहित्य उपलब्ध असलेल्या दुकानात ग्राहक खरेदी करीत आहेत.
अग्निहोत्र(रोज सूर्यास्तावेळी केले जाणारे हवन), गायत्री यज्ञांबरोबर अन्य यज्ञांसाठी लागणारी यज्ञकुंडे, यज्ञाशी संबंधित वस्तू, हवन सामग्रीतील लागणारे सर्वकाही साहित्य मोरया गोसावी मंदिर परिसरात मिळते. यज्ञाचे नित्य, नैमित्तिक, काम्य असे प्रकार असून यज्ञासाठी लागणाऱ्या वस्तू योग्य दरात उपलब्ध आहेत. श्री मोरया गोसावी परिसरात पूजाअर्चा, यज्ञसामग्री, धार्मिक ग्रंथ मिळणारी काही दुकाने आहेत. अनेकांना मोठे यज्ञ सहजपणे करणे शक्य नसते, अशावेळी गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली छोटे यज्ञकुंड घेतले जाते.
थेट खरेदी आणि बड्या कंपन्यांचा शिरकाव
श्रावणमास ते दिवाळीपर्यंतच्या काळात इथे खरेदीला उधाण असते. यज्ञसामग्री, धार्मिक वस्तूंची निर्मिती ही देशाच्या विविध भागांत होते. पूर्वी व्यापारी स्वत: जाऊन माल भरत असत. परंतु आता ऑनलाइन सेवेतून देशाच्या कुठल्याही भागातून धार्मिक साहित्य सहजपणे मागविता येणे शक्य झाले आहे. धार्मिक वस्तूंच्या निर्मितीत अनेक ब्रॅन्डेड कंपन्याही उतरल्या आहेत.
अनेक कंपन्यांच आता थेट भाविकांशी ‘कनेक्ट’ झाल्या आहेत. त्यामुळे अनेकदा भाविक ऑनलाइन खरेदी करतात. परंतु येथे येणारे भाविक आणि पर्यटक मात्र येथूनच खरेदीला प्राधान्य देतात. विशेषत: संकष्टी चतुर्थीच्या दिवशी देवदर्शन आणि महिनाभराची पूजा सामग्रीची खरेदी केली जाते.
पूजाअर्चा, यज्ञसामग्री, धार्मिक ग्रंथ मिळणारी सर्वकाही सामग्री श्री मोरया गोसावी मंदिर परिसरात मिळते. आणि कोणतेही धार्मिक साहित्य योग्य दरामध्ये सहजपणे उपल्बध होत आहे, त्यामुळे नागरिक शहरातून तसेच ग्रामीण भागातून येथे खरेदीसाठी येतात.- प्रविण भोकरे, विक्रेते