- हातगाडी, व्यावसायिकांनी रस्ता गिळंकृत केल्याने वाहतुकीस अडथळा
चिखली – चिंचवड ते चिखली रस्त्यावरील थरमॅक्स चौकापासून चिखली गावापर्यंतच्या रस्त्यावर दोन्ही बाजूने अनधिकृतरित्या हातगाडी व स्थानिक व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे थरमॅक्स चौक ते चिखली रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यात आल्याने येथील वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. परंतु महापालिकेचा अतिक्रमण विभाग मूग गिळून गप्प असल्याने वाहनचालक व नागरिकांना प्रवास करताना मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.
थरमॅक्स चौक, कस्तुरी मार्केट, कृष्णानगर, साने चौक, चिखली रस्ता येथे बेकायदेशीर हातगाडीवाले, फळविक्रेते, भाजीपाला विक्रेते तसेच घरगुती वापराचे साहित्य विक्री करणारे तसेच कपड्याची दुकाने, पावभाजी, भेळ, कच्ची दाबेली आदी व्यावसायिकांनी पदपथावर अतिक्रमण केले आहेच परंतु मुख्य रहदारीच्या रस्त्यावर देखील अतिक्रमण केल्याने रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना प्रवास करताना मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे या परिसरात सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत आहे. तसेच लहान मोठे अपघात घडत आहेत. परंतु महापालिका प्रशासन याकडे डोळेझाक करत असल्याने अनेक वर्षांपासून हीच स्थिती येथे पाहण्यास मिळत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन व क्षेत्रीय कार्यालय यांनी येथील अतिक्रमण हटवून, येथील रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
रस्त्यातच केली जातात वाहने पार्क
स्थानिक व्यावसायिकांनी आपल्याकडे येणाऱ्या ग्राहकांसाठी वाहने पार्क करण्यासाठी जागाच ठेवली नाही. उलट आपली दुकाने रस्त्याच्या पदपथावर थाटली आहेत किंवा काही व्यावसायिकांनी आपल्या दुकानासमोरील पदपथ दुसऱ्या एखाद्या व्यावसायिकाला भाड्याने दिला आहे. त्यामुळे ग्राहक रस्त्यातच वाहने पार्क करून खरेदीसाठी जात आहेत. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. परंतु याकडे वाहतूक नियंत्रण विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने बेशिस्तपणे पार्किंग करणारांचे चांगलेच फावत आहे.
पदपथ झाले गायब
पदपथावर हातगाडी, चप्पल विक्री करणारे तसेच छोट्या वाहनांमध्ये स्नॅक सेंटर सुरू केलेल्या व्यावसायिकांनी, टेलर व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्याने या परिसरातील पदपथ गायब झाले आहेत. परंतु महापालिकेचा अतिक्रमण विरोध पथक हाताची घडी तोंडावर बोट अशी भूमिका निभावत असल्याने यांच्यावर कोणाचेही नियंत्रण राहिले नाही. त्यामुळे रस्ते अरुंद होत आहेत.
पादचाऱ्यांना अपघाताचा धोका
पदपथांवर अतिक्रमण झाल्याने पादचाऱ्यांना ये-जा करण्यासाठी मुख्य रहदारीच्या रस्त्याचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना चालताना जीव मुठीत धरून चालवे लागत आहे. तसेच वाहनाचा धक्का लागून पादचाऱ्यांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
अतिक्रमण विभागाला सूचना करून लवकरात लवकर थरमॅक्स चौक ते चिखलीगाव रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यात येईल. अनधिकृत टपरी, पथारी, हातगाडीवाले तसेच इतर व्यावसायिक यांच्यावर कारवाई करण्यात येईल. तसेच रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला जाईल. रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल.
– मनोज लोणकर, “फ’ क्षेत्रीय अधिकारी