जैसे थे स्थिती बदलण्याचा चीनचा प्रयत्न अस्वीकारार्ह – राजनाथ

* कुरापतखोर शेजाऱ्याला स्पष्ट संदेश

* 38 हजार चौरस किलोमीटर भूभागावर चीनचा अवैध कब्जा

* पाकिस्तानकडूनही काही भूभाग अवैधपणे स्वाधीन

* भारताला लडाखमध्ये एका आव्हानाला सामोरे जावे लागतेयं

नवी दिल्ली – भारत-चीन सीमेवर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी संसदेत देशाची भूमिका ठामपणे मांडली. पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेच्या (एलएसी) लगत जैसे थे स्थिती बदलण्याचा एकतर्फी प्रयत्न अस्वीकारार्ह असल्याचे चीनपर्यंत अतिशय स्पष्टपणे पोहचवण्यात आले आहे, असे त्यांनी म्हटले. त्याशिवाय, लडाखमधील 38 हजार चौरस किलोमीटर भूभागावर चीनने अवैध कब्जा केला असल्याची माहितीही त्यांनी दिली.

चीनी कुरापतींमुळे सीमेवर म्हणजेच एलएसीलगत चार महिन्यांपासून तणावाची स्थिती आहे. त्याबाबत लोकसभेत तपशीलवार निवेदन देताना राजनाथ यांनी कुरापतखोर चीनला स्पष्ट संदेशही दिला. भारताला लडाखमध्ये एका आव्हानाला सामोरे जावे लागत असल्याचे सांगण्यास मी कचरणार नाही.

अर्थात, आव्हानाचा मुकाबला करण्यास आणि देशाचा अभिमान उंचावण्यास भारतीय सशस्त्र दले समर्थ असल्याचा पूर्ण विश्‍वास सभागृहाने बाळगावा, असे म्हणत त्यांनी गलवान खोऱ्यात 15 जूनला झालेल्या संघर्षाचा उल्लेख केला. त्यादिवशी चीनने हिंसक संघर्षाची स्थिती निर्माण केली. त्यावेळी आपल्या 20 शूर जवानांनी प्राणांचे बलिदान दिले.

मात्र, चीनी बाजूलाही त्याची मोठी किंमत चुकवायला लावली. चिथावणीखोर कृत्ये होत असतानाही आपली सुरक्षा दले गरज असेल तिथे संयम राखतात आणि प्रसंगी शौर्याचेही दर्शन घडवतात, असे त्यांनी म्हटले. गलवान खोऱ्यातील संघर्षात चीनी सैनिकही ठार झाले. मात्र, चीन त्याविषयीची माहिती देण्यास कचरत आहे.

पुढे बोलताना राजनाथ यांनी चीनचा लडाखमधील काही भागावर अजूनही अवैध ताबा असल्याचे सांगितले. पाकिस्तानने तथाकथित 1963 च्या सीमा करारानुसार पाकव्याप्त काश्‍मीरमधील 5 हजार 180 चौरस किलोमीटर भारतीय भूभाग अवैधपणे चीनच्या स्वाधीन केला. अरूणाचल प्रदेशातील 90 हजार चौरस किलोमीटर भारतीय भूभागावरही चीनकडून दावा सांगितला जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

चीनकडून होणारी सैन्याची जमवाजमव आणि चीनी सैनिकांचे हिंसक वर्तन दोन्ही देशांमधील करारांचे उल्लंघन आहे. एलएसीलगत दोन्ही देश कमीत कमी सैन्य ठेवतील हा 1993 आणि 1996 च्या करारांमधील महत्वाचा घटक आहे.

मात्र, चीनने मोठ्या प्रमाणात सैनिकांना आणि शस्त्रसामग्रीला एलएसीलगत आणि अंतर्गत भागांत हलवले. चीनी हालचालींना प्रत्युत्तर म्हणून आपल्या सुरक्षा दलांनीही पुरेशी सज्जता ठेवली, असे राजनाथ यांनी स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.