67 वर्षांपूर्वी प्रभात : इतिहास घडविणारे रोग

बुधवार, ता. 16 माहे सप्टेंबर सन 1953

रोगांनी जरी मानव जातीला जर्जर केले असले तरी कित्येक वेळा हे रोगच नवा इतिहास घडविण्याला कारणीभूत झालेले आहेत. रोगांच्यामुळे लढाया जिंकल्या गेल्या आहेत व समाजजीवनांत क्रांती घडून आली आहे.

स्टॅलिनची दीर्घकालीन सर्वाधिकारशाही हा रोगाचाच प्रकार होता. रशियातील क्रांतीनंतर ट्रॉट्‌स्की क्रिमियांत जठरब्रणाने आजारी असता लेनिन एकाएकी मरण पावला. लेनिनच्या मृत्यूनंतर आजारीपणामुळे ट्रॉट्‌स्कीला ताबडतोब मॉस्कोला जाता आले नाही. त्यामुळे स्टॅलिनला संधी मिळून त्याने पक्षाची सर्व सूत्रे हाती घेतली व तो सर्वाधिकारी बनला. 

नेपोलियनचा रशियात जो पराभव झाला, त्याचे कारण त्याच्या सैन्यांत “टायफस’ नावाच्या तापाची साथ उद्‌भवली व पोलंडमधून कूच करताना नेपोलियनचे सैन्य या साथीला बळी पडले. रशियन सैनिकांना अनेक वर्षे या तापाची सवय झाल्यामुळे त्यांना तापाची बाधा झाली नाही व ते फ्रेंचांचा पाडाव करू शकले.

दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांना लिबियात इटालियन सैन्यावर विजय मिळवता आला, याचे कारण 1 लक्ष इटालियन सैनिक एका अज्ञात रोगाने जर्जर झालेले होते. भुकेलेले व अन्नान्नदशा झालेले लोक बंड करून उठणें शक्‍य असते, असा जो सार्वत्रिक समज आहे तो चुकीचा आहे. कारण बंड करावयाला लागणारी ताकद या लोकांच्या अंगी मुळीच नसते. त्यामुळे भुकेल्यांनी बंड केले किंवा क्रांती घडवून आणली असा इतिहासांत मुळीच दाखला नाही.

वाङ्‌मयांत व कलेतही रोगांचे प्रतिबिंब

युरोपातील 14व्या व 15 व्या शतकांतील वाङ्‌मयांत व चित्रकलेत प्लेग, महारोग इत्यादी रोगांचे दुष्परिणाम चित्रित केलेले आढळतात. “डिकॅमेरॉन’ हा ग्रंथ प्लेगमुळे निर्माण झाला. पुढील शतकांतील काव्यवाङ्‌मयांत क्षयरोगाचा उल्लेख असे व नाटक-कादंबऱ्यांमधून मुख्य नायिका ही क्षयरोगी दाखविलेली असे. जणू काय क्षयरोगी असणे ही फॅशन होती व क्षयरोगी दिसण्यासाठी कित्येक स्त्रिया आपल्या तोंडाला पावडर लावू लागल्या होत्या.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.