मुंबई – ठाकरे घरण्याला समृद्ध राजकीय वारसा लाभलेला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेची सुत्र उद्धव ठाकरे यांच्याकडे आली. त्यांनी शिवसेना वाढवलीच नाही तर आज शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. अर्थात उद्धव ठाकरेच मुख्यमंत्रीपदी विराजमान आहेत. आता उद्धव यांचे दुसरे चिरंजीव तेजस ठाकरे राजकारणात येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर राष्ट्रवादीचे नेते आणि पुराश्रमीचे शिवसैनिक छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
उद्धव ठाकरे यांचे थोरले चिरंजीव आदित्य ठाकरे राजकारणात सक्रिय असून आता मंत्रीपदी विराजमान आहेत. त्यातच उद्धव य़ाचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे राजकारणात येणार असल्याचं सुतोवाच महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे. त्यावरून राजकीय प्रतिक्रिया उमटत आहे. नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनीही त्यावर भाष्य केलं आहे.
भुजबळ म्हणाले की, तेजस अतिशय अवघड आहे. माझ्या डोक्याबाहेरचा विषय आहे. जीवसृष्टी सोडून तो राजकारणात येईल असं वाटत नाही. अर्थात त्याबाबतचा निर्णय ठाकरे कुटुंबीयच घेतील, असं भुजबळ म्हणाले. तसेच युवकांनी राजकारणात आलं पाहिजे, असं मतही त्यांनी व्यक्त केलं.