पुणे – प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस.ए.देशमुख यांनी एका कार्यक्रमात नागरिकांशी संवाद साधला. त्यामुळे नागरिक अतिशय सहजपणे व उत्स्फूर्तपणे त्यांच्याशी वेगवेगळ्या अडचणीबाबत विचारत होते. त्या सर्व शंकाचे निरसन देशमुख यांनी केले. याबरोबरच नागरिक अडचणींसाठी न्यायालयाकडे कसा संपर्क साधू शकतात.
तसेच, त्यांना मोफत कायदेशीर सल्ला व मोफत वकील कसे मिळू शकतील, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास सुमारे आठशे नागरिक उपस्थित होते. वडगावशेरी येथे पॅन इंडिया विधी साक्षरता अभियान अंतर्गत कायद्याविषयी जनजागृती शिबिर आयोजित करण्यात आले होते.
प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस.ए. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारंभास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रताप सावंत उपस्थित होते. हा कार्यक्रम पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. सतीश मुळीक यांनी आयोजित केला होता. यावेळी न्यायाधीश देशमुख यांनी नागरिकांशी संवाद साधला.
या कार्यक्रमात सावंत म्हणाले की, लोकांना कायद्यांची माहिती व्हावी. तसेच कायद्याविषयी जनजागृती व्हावी यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसार असे उपक्रम राबविले जात आहेत. प्रमुख वक्ते ऍड. विजय सावंत यांनी “विद्यार्थ्यांना व नागरिकांना शिक्षण हक्क’ या कायद्याबाबत माहिती दिली. प्रत्येक व्यक्ती सुशिक्षित होणं गरजेचं असल्याचं व त्यासाठी शासनाने हा कायदा केल्याचे सांगितले.
तर पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. सतिश मुळीक यांनी वडगावशेरी परिसरातील नागरिकांनी त्यांच्या घरांना कायदेशीरपणा प्राप्त करून घेण्यासाठी महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम अन्वये मनपा पुणे यांचेकडे रितसर अर्ज दाखल करुन आपापली घरे कशी नियमित करायची, याचे मार्गदर्शन केले.
त्यासाठी कोणकोणते कागदपत्रे सादर करावी याचीही माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ऍड. अशोक संकपाळ यांनी करत कार्यक्रमाचे प्रयोजन सांगितले. सूत्रसंचालन ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. पंडित कापरे यांनी केले. तसेच, पुणे बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ऍड. सचिन हिंगणेकर यांनी आभार मानले.