पुणे – शहराची वाहतूक गतिमान करणाऱ्या छत्रपती शिवाजी पुलाला येत्या 17 सप्टेंबर रोजी 100 वर्षे पूर्ण होत आहे. या पुलाचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय इतिहासप्रेमी मंडळाने घेतला आहे. यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले जाणार आहे. श्री शिवाजी प्रिपरेटरी मिल्ट्री स्कूलचे शंभर शालेय विद्यार्थी ऐतिहासिक वास्तूंचे जतन आणि संवर्धन करण्याची सामूहिक शपथ घेणार आहेत.
दि. 16 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी इतिहास अभ्यासक मोहन शेटे उपस्थितांना पुलाची माहिती देणार आहेत. या पुलाच्या निर्मितीत मोलाचे योगदान देणारे रावबहाद्दूर गणपतराव महादेव केंजळे यांचे वारसदार विनित केंजळे, इतिहास अभ्यासक मंदार लवाटे कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. मोहन शेटे म्हणाले, “शिवाजी पूल ब्रिटिशांनी बांधला असला तरी, गणपतराव केंजळे यांच्या देखरेखीखाली हे काम झाले.
केंजळे यांचे स्थापत्य कलेतील त्यांचे ज्ञान अभियंत्यापेक्षाही मोठे होते. पूर्वी “लॉइड ब्रिज’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या पुलाचे खरे नाव छत्रपती शिवाजी पूल असे आहे. काहीजण नवा पूल, छत्रपती किंवा कॉर्पोरेशन पूल असेही म्हटले जाते. पानशेत जलप्रलयासारख्या संकटाशी टक्कर देत उभा असलेला हा पूल गेली 100 वर्षे पुणेकरांची सेवा करत उभा आहे.
पुलाचा इतिहास
सन 1920 पूर्वी मुठा नदी ओलांडण्यासाठी पुण्यात फक्त दोन पूल होते. याच काळात भांबुर्डा गावठाणात वस्ती वाढत होती. म्हणून त्या वेळच्या ब्रिटिश सरकारने शनिवारवाड्यासमोर नवीन पूल बांधण्याचे ठरवले, जानेवारी 1920 मध्ये या पुलाचे काम सुरू होऊन 17 सप्टेंबर 1923 रोजी मुंबई प्रांताचे गव्हर्नर सर जॉर्ज लॉइड यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन झाले होते.