मुंबई – शिवम दुबेची अर्धशतकी खेळी वगळता चेन्नई सुपर किंग्जच्या प्रमुख फलंदाजांनी पंजाब किंग्जसमोर सपशेल शरणागती पत्करली व आयपीएल स्पर्धेत रविवारी झालेल्या लढतीत 54 धावांनी पराभवाचा सामना केला.
पंजाबने विजयासाठी दिलेल्या 181 धावांचा पाठलाग करताना चेन्नईच्या ऋतुराज गायकवाडसह प्रमुख फलंदाज अपयशी ठरत असताना दुबेने जिद्दीने फलंदाजी केली. तो 30 चेंडूत 6 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने 57 धावा करून बाद झाला. त्यानंतर माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी वगळता अन्य एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर टिकून फलंदाजी करता आली नाही. धोनीदेखील 28 चेंडूत 1 चौकार व 1 षटकार फटकावत 23 धावांवर बाद झाला व चेन्नईचा डाव 18 षटकांत सर्वबाद 126 धावांवर संपवताना सामना 54 धावांनी जिंकला.
तत्पूर्वी, लियाम लिव्हिंगस्टोनचे अर्धशतक व अन्य फलंदाजांनी केलेल्या उपयुक्त खेळीमुळे पंजाब किंग्जला चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध 20 षटकांत 8 बाद 180 धावा करता आल्या. तळात जीतेश शर्मा, कागिसो रबाडा व राहुल चहरने केलेल्या आक्रमक फलंदाजीमुळे त्यांना समाधानकारत धावसंख्या उभारता आली.
चेन्नईचा कर्णधार रवींद्र जडेजाने नाणेफेक जिंकून पंजाबला पहिल्यांदा फलंदाजी दिली. त्याचा हा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवला. पंजाबचा कर्णधार व सलामीवीर मयंक आग्रवालला मुकेश चौधरीने बाद करत त्यांना पहिला धक्का दिला. त्यानंतर भानुका राजपक्षे याला चेन्नईचा माजी कर्णधार व यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीने अविश्वसनीय धावबाद केले. यावेळी पंजाबची 2 बाद 14 अशी बिकट स्थिती बनली होती. त्यानंतर मात्र, शिखर धवन व लियाम लिव्हिंगस्टोन यांनी अफलातून फलंदाजी करत संघाचे शतक फलकावर लावले.
धवन स्थिरावलेला असतानाही 24 चेंडूत 4 चौकार व 1 षटकार यांच्या मदतीने 33 धावांवर परतला. लिव्हिंगस्टोनने जीतेश शर्माच्या साथीत बहुमोल भागीदारी केली. दरम्यान, लिव्हिंगस्टोनने आपले अर्धशतक साकार केले. अर्धशतक पूर्ण झाल्यावर लिव्हिंगस्टोन धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात 60 धावांवर बाद झाला. त्याने या खेळीत 32 चेंडूंचा सामना करताना 5 चौकार व 5 षटकारांच्या मदतीने 60 धावा केल्या.
जीतेश शर्माने 17 चेंडूत 3 षटकारांच्या मदतीने 26 धावांची खेळी केली. त्यानंतर भरात असलेल्या शाहरुख खान व ओडेन स्मिथ यांनी साफ निराशा केली. तळात कागिसो रबाडा व राहुल चहरने केलेल्या फटकेबाजीमुळे पंजाबला 20 षटकांत 8 बाद 180 धावांपर्यंत मजल मारता आली.
संक्षिप्त धावफलक –
पंजाब किंग्ज – 20 षटकांत 8 बाद 180 धावा. (लियाम लिव्हिंगस्टोन 60, शिखर धवन 33, जीतेश शर्मा 26, ख्रिस जॉर्डन 2-23, ड्वेन प्रीटोरियस 2-30). चेन्नई सुपर किंग्ज – 18 षटकांत सर्वबाद 126 धावा. (शिवम दुबे 57, महेंद्रसिंह धोनी 23, राहुल चहर 3-25, वैभव अरोरा 2-21, लियाम लिव्हिंगस्टोन 2-25).