मायामी – पोलंडची स्टार महिला टेनिसपटू इगा स्वेटेक हिने जपानच्या नाओमी ओसाका या बलाढ्य खेळाडूचा पराभव केला व रविवारी येथे पार पडलेल्या मायामी टेनिस स्पर्धेचे महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले.
या स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्वेटेकने ओसाकाचा 6-4, 6-0 असा सरळ दोन सेटमध्ये केवळ 51 मिनिटांत पराभव केला. या विजेतेपदामुळे जागतिक महिला टेनिस क्रमवारीत स्वेटेक अग्रस्थानी दाखल झाली आहे. या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या स्वेटेकने ऍश्ले बार्टीने निवृत्ती घेतल्यामुळे पहिले स्थान प्राप्त केले.
स्वेटेकचे हे यंदाच्या मोसमातील तिसरे विजेतेपद ठरले असून 2020 साली झालेल्या फ्रेंच ओपन स्पर्धेपासून तिने ही कामगिरी केली आहे. ओसाका देखील या स्पर्धेत संभाव्य विजेती मानली जात होती. मात्र, पहिला सेट वगळता तिला स्वेटेकला लढतच देता आली नाही.