आबूधाबी – अंबाती रायडू आणि फाफ डुप्लेसी यांच्या दमदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्ज संघाने मुंबई इंडियन्सचा सहज पराभव केला व यंदाच्या आयपीएल स्पर्धेत विजयी सलामी दिली. मुंबईने विजयासाठी दिलेले 163 धावांचे आव्हान चेन्नईने 19.2 षटकांत 5 गडी गमावून पार केले.
रायडूने 48 चेंडूत 6 चौकार व 3 षटकार फटकावत 71 धावांची खेळी केली. त्याने डुप्लेसीच्या साथीत शतकी भागीदारी करत चेन्नईचा विजय निश्चित केला. डुप्लेसीने 44 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने नाबाद 58 धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
तत्पूर्वी, मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर कव्हर ड्राईव्हचा चौकार मारत यंदाच्या आयपीएलचा थाटात प्रारंभ केला. मुंबईने चेन्नईसमोर विजयासाठी 163 धावा करण्याचे आव्हान ठेवले.
पहिल्या चेंडूवर चौकार फटकावल्यानंतर रोहितने आणखी एक चौकार फटकावला. मात्र, स्थिरावला असे वाटत असतानाच बाद झाला. दुसरा सलामीवीर कॉन्टन डीकॉकही चांगली सुरुवात करत स्वस्तात बाद झाला. त्यानंतर सूर्यकुमार यादव व सौरभ तिवारी यांची जोडी जमली. मात्र, तिवारी अर्धशतक फटकावण्यात अपयशी ठरला. फाफ डुप्लेसीने सीमारेषेवर अत्यंत कसरत करत तिवारीला व आक्रमक हार्दिक पंड्याला झेलबाद केले. रवींद्र जडेजाने या दोघांना बाद केले.
यानंतर कॅरन पोलार्डही केवळ 18 धावा करून तोही परतला. यावेळी मुंबईने दीडशतकी मजल मारली होती. त्यानंतर मात्र आक्रमक फलंदाजी करण्याच्या नादात मुंबईचे फलंदाज ठराविक अंतराने बाद होत गेले व अखेर 9 बाद 162 धावांवर त्यांचा डाव रोखण्यात चेन्नईने यश मिळवले.
…अन धोनी अवतरला
गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेनंतर विश्रांती घेतलेल्या धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर प्रथमच सामन्यात पाऊल ठेवले. विश्वकरंडक स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य लढतीत धोनी धावबाद झाला व त्यामुळे भारताने सामना गमावला होता. तो जेव्हा बाद झाला त्यावेळी 7 वाजून 29 मिनिटे झाली होती.
आज धोनीने मैदानात पाऊल ठेवले तेव्हा 7 वाजून 30 मिनिटे झाली होती. धोनीने सीमारेषा ओलांडून मैदानात प्रवेश केल्यावर दोन्ही संघातील खेळाडूंनी त्याच्यासाठी टाळ्यांचा गजर केला व त्याचे स्वागत केले.