- दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी राहण्याची शक्यता
पिंपरी – करोनाला अटोक्यात आणण्यात आपणाला यश आले आहे. सध्या बाधितांचा आकडा कमी होत असून, पॉझिटिव्हचा रेषोही दहा टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. त्यामुळे करोनाचे प्रथमिक लक्षणे दिसताच तात्काळ तपासणी करा, असे आवाहन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज केले.
आयुक्त कक्षामध्ये पत्रकारांशी बोलताना आयुक्त हर्डीकर यांनी वरील आवाहन केले. पुढे बोलताना ते म्हणाले, दिवाळीनिमित्त बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी झाली होती. सध्या वातावरणामध्येही बदल होत आहेत. त्यामुळे ताप, सर्दी, खोकला अशी कोणतीही लक्षणे आढळून आल्यास करोनाची तात्काळ तपासणी करणे सर्वांच्या दृष्टीने सकारात्मक आहे. करोना पॉझिटिव्ह आढळून आल्यास सुरुवातीचा कालावधी असल्यास तो आटोक्यात आणण्यात यश येत आहे. मात्र तपासणी उशिरा झाल्यास आणि लक्षणे तीव्र असल्यास धोका वाढण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे लक्षणे दिसून आल्यास तात्काळ तपासणी करून घ्यावी.
शहरातील किमान 35 ते 40 टक्के लोकांना करोना होऊन गेल्याचे सर्वेक्षण अहवालातून समोर आल्यामुळे दुसऱ्या लाटेचा व्यापक प्रभाव निर्माण होण्याची शक्यता कमीच आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्येच आपल्याकडे मोठ्या प्रमाणात लाट होती. त्या कालावधीत अनेकांना करोना होऊन गेल्यामुळे दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी राहण्याची शक्यता आहे. असे असले तरी आपण महापालिकेचे आयसीयू युनिट करोनाबाधितांसाठी सुरूच ठेवणार असल्याचेही आयुक्त म्हणाले.
सार्वजनिकरित्या छटपूजा करण्यास शहरात ‘बंदी ‘
पिंपरी – उत्तर भारतीय बांधवांचा महत्त्वाचा समजला जाणारा छटपूजेचा उत्सव आजपासून सुरू झाला असला तरी सार्वजनिकरित्या हा उत्सव करण्यास बंदी घालण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.
सार्वजनिकरित्या उत्सव साजरा करण्यास बंदी असली तरी आपल्या स्वत:च्या खासगी जागेमध्ये हा उत्सव साजरा करता येणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर ही बंदी घालण्यात आल्याचेही आयुक्त म्हणाले. दिवाळी पाठोपाठ उत्तर भारतीय बांधवांचा छटपूजा हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. यावर्षी करोनामुळे सर्वच उत्सव अडचणीत आले आहेत. परिस्थिती पूर्वपदावर येत असली तरी रुग्णांची संख्या आणि करोनाचा प्रभाव विचारात घेऊन कोणत्याही नदीकाठी सार्वजनिकरित्या छटपूजा करता येणार नसल्याचे आयुक्त म्हणाले.
मिळकतकराचे उत्पन्न वाढणार
खासगी संस्थेच्या माध्यमातून सध्या मिळकतींचा शोध घेण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली असून, पहिल्या दोन आठवड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मिळकती शोधण्यात यश आल्याचे आयुक्त म्हणाले. ही मोहीम पुढील दोन महिने सुरू ठेवण्यात येणार असून, या द्वारे नोंदी नसलेल्या मिळकतींचा शोध घेतला जाणार आहे. सध्या प्राप्त माहितीवरून मिळकतींची संख्या लक्षणीयरित्या वाढत असून, वाढलेल्या मिळकतीद्वारे महापालिकेच्या उत्पन्नात मोठी भर पडेल, असा दावाही आयुक्तांनी या वेळी बोलताना केला.