नैरोबी – अफ्रिका आणि मध्यपुर्वेतील सात राष्ट्रांना सध्या दुष्काळाची समस्या चांगलीच भेडसावत आहे. या सात राष्ट्रांना संयुक्तराष्ट्रांकडून 100 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची मदत घोषित करण्यात आली आहे.
संयुक्तराष्ट्रांच्या मानवतावादी कार्याच्या प्रमुखांनी ही मदत जाहीर करताना आता जगाच्या अनेक देशांना यापुढील काळात दुष्काळाची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावणार आहे असा इशारा दिला आहे.
संयुक्तराष्ट्रांनी जाहींर केलेल्या निवेदनानुसार अफगाणिस्तान, बुर्किनाफासो, कॉंगो, नायजेरिया, दक्षिण सुदान आणि येमेन या राष्ट्रांसाठी 80 दशलक्ष डॉलर्सची मदत जाहीर करण्यात आली असून इथोपियातील भूकग्रस्त लोकांच्या मदतीसाठी 20 दशलक्ष डॉलर्सची मदत राखून ठेवण्यात आली आहे.
तेथे सध्या अंतर्गत यादवी जोरदार पेटली आहे. संयुक्तराष्ट्रांनी म्हटले आहे की बुर्किनाफासो, उत्तरपुर्व नायजेरिया, दक्षिण सुदान आणि येमेन या देशांनी आत्ताच काही कृती केली नाही तर त्यांच्या देशातील दुष्काळाची स्थिती अत्यंत भीषण होत जाणार आहे. यापुढे जगातील अन्य देशांनाही दुष्काळाच्या समस्येचा वारंवार सामना करावा लागू शकतो असेही या संघटनेने म्हटले आहे.