Char Dham Yatra 2023 : अनेकांचे चार धाम यात्रा (Char Dham Yatra 2023) करण्याचे स्वप्न असते. हिमालयाच्या कुशीत दुर्गम भागात स्थापित असलेली चार धाम म्हणजे गंगोत्री, यमनोत्री, केदारनाथ आणि बद्रिनाथ.
पूर्वीच्या काळी लोक चार धाम यात्रेला (Char Dham Yatra) गेले की त्यांची परत येण्याची शक्यता खूपच कमी असे. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये पूर्वीच्या तुलनेत चारधाम यात्रा करणे खूप सोपे झाले.
याचे कारण एक तर वाहनांची सोय चांगली झाली आणि अगदी मंदिराजवळ घेऊन जाणारी वाहने आणि इतर सोयी असल्याने ही यात्रा करणे सुलभ बनत गेले. त्यामुळेच दरवर्षी या यात्रेची घोषणा कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले असते.
दरम्यान, 25 एप्रिलपासून सुरू झालेल्या चारधाम यात्रेचे दरवाजे नोव्हेंबरमध्ये 6 महिन्यांसाठी बंद होणार आहेत. येत्या14 नोव्हेंबरला गंगोत्री, 15 नोव्हेंबरला यमुनोत्री आणि केदारनाथ धामचे दरवाजे बंद होतील.
तर 18 नोव्हेंबरला बद्रीनाथ धामचे दरवाजे बंद होणार आहेत. शिखांचे मुख्य तीर्थक्षेत्र हेमकुंड साहिबचे दरवाजे 11 ऑक्टोबर रोजी बंद करण्यात आले आहेत.
यावेळी आतापर्यंत 52 लाखांहून अधिक भाविकांनी उत्तराखंड चार धाम यात्रेला भेट दिली आहे. हा आतापर्यंतचा विक्रमी आकडा असल्याचे बोलले जात आहे. यावेळी ही यात्रा 18 नोव्हेंबरपर्यंत चालणार असून, त्यानंतर चारही धामचे कपाट बंद होणार आहेत.