डेहराडून – उत्तराखंड मधील चार धाम यात्रेला प्रारंभ झाला असून या यात्रेच्या मार्गावर यात्रेकरूंच्या संख्येवर जी मर्यादा होती ती हटवण्यात आली आहे. यात्रेकरूंच्या नोंदणीसाठी ऑन लाईन आणि ऑफ लाईन अशी दोन्ही स्वरूपाची नोंदणी सुरू करण्यात आली आहे. त्याद्वारे यात्रेकरूं लक्ष ठेवणे आणि त्यांच्या सुरक्षेची काळजी घेणे सोपे जाणार आहे.
दरम्यान बाबा केदारनाथ यांचा पंचमुखी डोली उत्सव हिमालयातील मंदिराकडे रवाना करण्यात आला आहे. हिवाळ्यात बाबा केदारनाथ यांचे स्थान उकीमठ येथे नेले जाते. तेथून ही डोली आता केदारनाथ मंदिराकडे रवाना करण्यात आली असून ही डोली 24 तारखेला केदारनाथ येथे पोहचणार आहे.
आज अक्षयतृतीयेच्या शुभ मुहुर्तावर परंपरेप्रमाणे ही चार धाम यात्रा सुरू झाली आहे. गंगोत्री धामचे प्रवेशद्वार आज उघडले गेले असून केदारनाथ मंदिराची दारे 25 एप्रिलला उघडली जाणार आहेत. तर, दुसरीकडे बद्रीनाथ धामचे दरवाजे 27 एप्रिलला उघडले जातील. दरम्यान चारधाम यात्रा मार्गावर पुरेशी सुरक्षा व्यवस्था आणि यात्रेकरूंसाठी सुविधा उभारण्यात आल्या आहेत.