वॉर्सा : आधुनिक जगात सर्वसाधारणपणे कोणत्याही शहराचा विकास हा विविध भागांमध्ये होत असतो. शहराच्या अनेक भागांमध्ये वसाहती विकसित होत असतात आणि त्या माध्यमातूनच ते शहर विकसित होत जाते. परंतु युरोपमधील पोलंड देशामध्ये असे एक गाव आहे जे फक्त एकाच रस्त्यावर वसले आहे. तब्बल 6 हजार लोक एकाच रस्त्याच्या दोन्ही बाजूला वसाहती करून रहात आहेत.
दक्षिण पोलंडमध्ये हे गाव वसले असून ते ‘लिटिल तुस्कानी’ या नावाने ओळखले जाते. क्रॅको या महानगरापासून 29 किलोमीटर अंतरावर हे गाव वसले आहे. या गावातील नऊ किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूलाच फक्त या शहरातील लोक राहतात, बाकी शहरात कोठेही मानवी वसाहत नाही.
रस्त्याच्या दोन्ही बाजूने असलेल्या घरांची रचना ही सारखी आहे. घर, घराच्या मागे बाग अशी रचना असून या शहराचे आकाशातून घेतलेले छायाचित्र नुकतेच व्हायरल करण्यात आले आहे. त्यानंतर या अनोख्या शहराची चर्चा सुरू झाली. महत्वाची गोष्ट म्हणजे हे शहर जरी असले तरी ते शेती करणाऱ्या लोकांचे शहर आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला नागरिक त्यांच्या घराच्या मागे असलेल्या जमिनीवर शेती करण्याचे काम करतात.