साद-पडसाद: बदलता समाज…घातक

वसंत बिवरे

काळानुरूप समाजातही बदल झाले. चांगले-वाईट स्वीकारून समाज पुढे चालला आहे. पूर्वीचे लोक सुखी होते की आताचे? असा प्रश्‍नही बराच वेळा विचारला जातो. बदललेल्या समाजात अनेक वाईट प्रवृत्ती निर्माण झाल्याने असा समाज घातकच म्हटला पाहिजे…

आज समाजाचा दर्जा ढासळत चालला आहे असे सर्वजण म्हणतात खरे, पण त्याची यथायोग्य कारणमीमांसा कोणीच करीत नाहीत. पूर्वीचा समाज आणि आजचा समाज यात खूप बदल झालेला आहे. पूर्वीच्या काळी ग्रामीण भागात समाजामध्ये बारा बलुतेदार ही प्रथा अस्तित्वात होती. प्रत्येकजण आपले काम विना तक्रार करीत होता. गाव कसे अगदी गुण्यागोविंदाने नांदत होते. त्यांच्या व्यवसायावरून त्यांना व्यवसायवाचक नावे रूढ झाली. आजही ही नावे अस्तित्वात आहेत फरक एवढाच की आज कोणते काम कोणी करावे असे बंधन राहिलेले नाही. ज्याला जो व्यवसाय आवडेल त्याने तो व्यवसाय करावा. आय.टी.आय. सारख्या संस्थेत आवडीचा विषय निवडता येतो. सर्वांना मुक्‍त प्रवेश आहे.

वास्तविक प्रत्येक काम आपल्या जागी श्रेष्ठच असते. अमुक काम हे खालच्या दर्जाचे आणि तमुक वरच्या दर्जाचे असे आज तरी मानले जात नाही. अलीकडे शिक्षण संस्थांचे पेव
फुटले आहे. लाखो पदवीधर तयार होत आहेत पण त्यांना व्यवसाय मिळत नाही हे वास्तव आहे. पदवीधारकांचा नुसता लोंढा तयार करून चालणार नाही. त्यांना रोजगार मिळायला हवा. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला रोजगार मिळवून देणे सरकारचे कर्तव्य आहे; परंतु आज तरी कोणतेही सरकार सर्वच पदवीधारकांना रोजगार देऊ शकत नाही ही शोकांतिका आहे. एवढे महागडे शिक्षण घेऊनही सुशिक्षित तरुण बेकार म्हणून फिरत आहेत. बेरोजगारी वाढत चालली आहे. दुसरे असे की गुणवत्तेपेक्षा आज जातीला आणि पैशाला अधिक महत्त्व दिले जात आहे. खरा गरजू आणि गुणवंत बाजूला फेकला जातो आहे. क्षमता असूनही तो डावलला जातो हे वास्तव आहे. काहींची वशिल्याने वर्णी लागते त्यामुळेही बाकीचे बेकारच राहतात.

समाजात जातीवाद आणि भ्रष्टाचार वाढीस लागला आहे. यात दोष द्यायचा तर कोणाला? सध्या जातीवादाचे पेव फुटले आहे. अनेक जातीवादी संघटना आज अस्तित्वात आहेत.अशा संघटनांमुळेच जाती-जातीत तेढ निर्माण होत आहे. समाजावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे जाती-जातीत सलोखा राहिला नाही. वास्तविक पाहता “माणूस’ ही एकच जात असायला हवी. पण तसे चित्र दिसत नही. माणसांनी स्वत:च्या स्वार्थासाठी वेगवेगळ्या जाती निर्माण केल्या.

सामाजिक विकासाची कामे एकमेकांच्या सहकार्यावरच अवलंबून असतात.त्यामुळे सर्व जातीवादी संघटनांवर कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी. याउलट विविध जाती- धर्माचे लोक सामाजिक बांधिलकीच्या भावनेने एखादे विधायक कार्य हाती घेत असतील आणि त्यासाठी संघटना स्थापन करत असतील तर अशा संघटनांना त्वरित मान्यता द्यावी आणि सर्वतोपरी त्यांना सहकार्य करावे. कारण अशा संघटनामध्ये कोणत्याही एका जातीचे अथवा धर्माचे लोक असणार नाहीत. देशाचा सर्वांगीण विकास हा एकच विषय त्यांच्या समोर असला पाहिजे आणि त्याच ध्येयाने त्या प्रेरित झाल्या असल्या पाहिजेत.

थोडक्‍यात, संपूर्ण समाजव्यवस्था बदलायला हवी. आज आपण पाहतो नैतिकमूल्ये समाजाकडून पायदळी तुडविली जात आहेत. समाजात नैतिकता हरवत चाललेली आहे. नैतिक मूल्यांची जोपासना करण्यासाठी प्रशिक्षण केंद्रे उघडावी लागतील. प्रत्येक नागरिकाला नैतिक मूल्यांचे प्रशिक्षण द्यावे लागेल अशी परिस्थिती आहे. एवढ्यावरच भागणार नाही तर प्रत्येकाने नैतिक मूल्यांचे पालन केलेच पाहिजे, असा दंडक घातला पाहिजे. प्रत्येकाने स्वत:पासून सुरुवात केली तरच समाज सुधारेल आणि देशाचा विकास साध्य करता येईल.

हे सर्व काही सांगायला ठीक आहे; पण या सर्व बाबी विचारात कोण घेणार? कोण करणार त्या दृष्टीने प्रयत्न? समजात कोणी तसा प्रयत्न करायला लागलाच तर लोक त्यालाच वेड्यात काढतात. सहकार्य करायचे सोडून त्यालाच नाउमेद कसे करता येईल यासाठी धडपड करतात. यावर कोणीही काहीही बोलणार नाही. अशा लोकांमध्ये देशाची अस्मिता आणि नैतिकता अभावानेच आढळते.

हे चित्र बदलायला हवे असेल तर याचा प्रत्येकाने विचार करायला हवा नाही तर येणाऱ्या पिढीचे भविष्य आणि भवितव्य अंधकारमय असेल यात मुळीच शंका नाही. आजची परिस्थिती तर खूपच भयानक आहे. माणसांत पशुप्रवृत्ती वाढत चालली आहे. माणुसकी हरवत चालली आहे. नैतिकता लोप पावत चालली आहे. एक ना अनेक बाबी आहेत. या सर्वांचा विचार करायला हवा.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)