पुणे – हडपसर परिसरातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी वाहतूक शाखेकडून नो-पार्किंगचे आदेश दिले आहेत. तर लष्कर वाहतूक विभागांतर्गत काही परिसरात वाहतुकीत बदल केला आहे. पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी याबाबतचे अंतिम आदेश गुरुवारी काढले.
हडपसर वाहतूक विभागांतर्गत हेमंत करकरे उद्यान आणि टक्कर आर्मी एन्क्लेव्ह हौसिंग सोसायटी प्रवेशद्वार ते गोंधळेनगर टी जंक्शनपर्यंत नो-पार्किंग आणि सावली कॉर्नर, पुणे-सोलापूर रोड ते विलू पुनावाला हॉस्पिटलपर्यंत नो-पार्किंग केले आहे.
तर लष्कर वाहतूक विभागांतर्गत गोळीबार मैदान चौक आणि महावीर चौकाकडून ईस्ट स्ट्रीट रस्त्यावर जाणाऱ्या वाहतुकीला एम.जी. रस्त्यावरील महावीर चौक ते नाझ चौकादरम्यान असलेल्या सबवे लेनमधून उजवीकडे वळण्यास परवानगी दिली आहे.
यासह ईस्ट स्ट्रीट रस्त्यावरून एम.जी.रस्त्यावर जाणाऱ्या वाहतुकीला जॉर्ज हॉटेल चौक ते इंदिरा गांधी चौकादरम्यान असलेल्या मार्झोरिन लेनमधून उजवीकडे वळता येणार आहे.
या रस्त्यांवरील यापूर्वीचे पार्किंग आणि वाहतुकीसंबंधिचे निर्बंध रद्द समजण्यात येणार आहेत. अत्यावश्यक सेवेतील वाहने (रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि पोलीस वाहने) वगळता अन्य सर्व वाहनांना या आदेशांचे पालन करणे बंधनकारक आहे.