पुणे -ख्रिसमस सणासाठी कॅम्प भागात नागरिकांची गर्दी होते. या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शुक्रवारी (25 डिसेंबर) सायंकाळी 7 वाजल्यानंतर गर्दी संपेपर्यंत आवश्यकतेनुसार वाहतूक वळविण्यात येणार आहे.
ख्रिसमसमुळे एम.जी.रस्ता, अरोरा टॉपरसह कॅम्पच्या विविध भागांत नागरिकांची गर्दी होते. त्यामुळे या भागात वाहतूक कोंडी उद्भवते. ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक सुरक्षित आणि सुरळीतपणे होण्यासाठी वाहतूक शाखेकडून वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत. सायंकाळी सात वाजल्यानंतर आवश्यकतेनुसार तात्पुरत्या स्वरुपात वाहतूक बदल करण्यात येतील. याबाबत वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी आदेश दिले.
कॅम्प भागात पुढीलप्रमाणे होणार वाहतूक बदल :
वाय जंक्शनवरून एम.जी. रोडकडे येणारी वाहतूक 15 ऑगस्ट चौक येथे बंद करून, वाहतूक कुरेशी मशीद आणि सुजाता मस्तानी चौकाकडे वळविण्यात येणार आहे.
इस्कॉन मंदिर चौकाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, अरोरा टॉवरकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे.
व्होल्गा चौकातून महंमद रफी चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार असून, ही वाहतूक सरळ ईस्ट स्ट्रीट रोडने इंदिरा गांधी चौकाकडे सोडण्यात येणार आहे.
इंदिरा गांधी चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार असून, ही वाहतूक इंदिरा गांधी चौकातून लष्कर पोलीस स्टेशन चौकाकडे वळविण्यात येणार आहे.
सरबतवाला चौकाकडून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करून ती ताबुत स्ट्रीट रस्त्यामार्गे पुढे सोडण्यात येणार आहे.