पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड एकाउंटेंट्स ऑफ इंडियामार्फत (आयसीएआय) घेण्यात येणाऱ्या सीए फाउंडेशन, सीए अंतिम आणि इंटरमिजिएट परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहेत. लोकसभा निवडणुकांमुळे परीक्षांच्या तारखात बदल होणार असल्याची यापूर्वीच आयसीएआयने दिली होती. त्यानुसार हे बदल करण्यात येणार आहेत.
नव्या परीक्षांच्या तारखा १९ मार्च रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. दरम्यान, सीए इंटरमिजिएट ग्रुप एकची परीक्षा दि. 3 ते 7 मे रोजी घेतली जाणार होती आणि ग्रुप-२ ची परीक्षा 9 ते 13 मे रोजी होणार होती.
सीए अंतिम गट एकची परीक्षा दि. 2 आणि 6 मे रोजी आणि गट दोनची परीक्षा 8 ते 12 मे या दरम्यान घेण्यात येणार होती. याशिवाय सीए फाउंडेशन परीक्षा दि. 20 ते 26 जून रोजी देशभरातील नियुक्त परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार होती.
ही परीक्षा आता पुढे ढकलण्यात आली आहे. या सर्व परीक्षांसाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली आहे. अर्जाची प्रक्रिया 23 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण झाली. परीक्षा मे आणि जूनमध्ये होणार होती. त्यात आता बदल होणार आहे. परीक्षांच्या नव्या तारखांकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.