कोल्हापूर : पाटील चेहऱ्यावर भाव न बदलता फटका लागवतो. त्यामुळे पवारांना पाटील काय चीज आहे ते अजून कळले नाही, अशा शब्दात महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर पलटवार केला.
चंद्रकांत पाटील यांना कोथरूडमध्येच अडकवून ठेवले आहे, त्यांना इतरत्र जाता येत नाही असे विधान करीत विरोधकांनी पाटील यांची कोंडी केली असल्याचे म्हटले होते. शरद पवार यांच्या विधानाचा समाचार आज पाटील यांनी कोल्हापुरात उपरोक्त विधान करत घेतला. कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार आमदार राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारासाठी झालेल्या पदाधिकारी, कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना पाटील यांनी ‘पवार तुम्हाला पाटील कळलेच नाहीत, असा टोलाही लगावला.
कोथरुडमध्ये चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात मनसेचे किशोर शिंदे हे रिंगणात उतरले असून काँग्रेस-राष्ट्रवादीने आपला उमेदवार उभा न करता मनसेच्या शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. त्याआधारे पाटील विरोधात सर्वपक्षीय असा रंग दिला जात आहे. त्यावरूनही चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांवर शरसंधान केले. विधानसभा निवडणुकीत आघाडी करताना मनसेला त्यामध्ये घेतले नाही. आणि आता मात्र मनसेच्या उमेदवाराला कोथरुडमध्ये माझ्याविरोधात पाठिंबा देण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.