पुणे – चांदणी चौकातील एकूण आठ मार्गिकेचे (रॅम्प्स) काम पूर्ण झाले असून, त्यावरून वाहतूक सुरुही झाली आहे. आता “ला व्हॅली कासा’ सोसायटीसमोरील पुलाचे काम येत्या 25 मे पर्यंत पूर्ण होईल. तर एनडीए ते बावधन या मुख्य उड्डाणपुलाचे काम 15 जुलैपर्यंत पूर्ण होईल असे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटरवरुन सांगितले.
चांदणी चौकातील प्रकल्पाचे उद्घाटन 1 मे रोजी करणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दोन महिन्यांपूर्वी पुण्यातील एका कार्यक्रमात केली. त्याचवेळी कामाची सद्यस्थिती पाहता, “हा मुहुर्त गाठणे शक्यच नाही’, “प्रकल्पाचे काम जुलै अखेर पूर्ण होणार’ असे दैनिक प्रभातने स्पष्ट केले होते. त्यानुसार 1 मे चा मुहुर्त हुकला, पण नितीन गडकरी यांनी या मुहुर्तावर ट्वीट करत कामाच्या सद्यस्थितीची माहिती देत, काम 15 जुलैपर्यंत पूर्ण होईल असे सांगितले. मात्र, यावेळी मुहुर्ताची घोषणा केली नाही.
पुण्यातील चांदणी चौक येथील इंटिग्रेटेड स्ट्रक्चरचे (एकात्मिक रचना) काम पूर्णत्वास येत आहे. सद्यस्थितीत हे काम 90 टक्के पूर्ण झाले असून, प्रकल्पातील ज्या आठ मार्गिका (रॅम्प्स) होत्या त्या पूर्ण झालेल्या आहेत. या मार्गिकांवरून सध्या वाहतूक सुरळीतपणे सुरू असल्याचे त्यांची सांगितले. दरम्यान, एनडीए ते बावधन या मुख्य उड्डाणपुलाचे काम नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून करण्यात येत आहे, त्यामुळे हा पुल 15 जुलैपर्यंत पूर्ण होईल. तोपर्यंत मार्गिकांचा वापर करून वाहतूक सुरळीत ठेवण्यात आल्याचे गडकरी यांनी सांगितले.
अंडरपासमुळे कामाला विलंब
वेदभवन समोर आणखीन एक अंडरपास करण्यात येणार आहे. मात्र, या कामासंदर्भातील जागेचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात न्याय प्रविष्ट असल्याने कामाला विलंब होत असल्याचे नितीन गडकरी यांनी नमूद केले.
पर्यायी वाहतुकीसाठी चाचपणी
चांदणी चौक येथे उड्डाणपूल उभारण्याचे काम सुरू आहे. सध्यस्थितीत उड्डाणपुलाचे खांब उभारण्यात आले असले, तरी नियोजनाप्रणाणे लागणारे सिमेंट कॉंक्रीटचे गर्डर पूर्ण तयार नाहीत. तसेच हे गर्डर टाकण्यासाठी मार्गावरील वाहतूक काही काळ बंद ठेवावी लागणार आहे. गर्डर टाकण्यापूर्वी या मार्गावरील वाहतुकीसंदर्भात दोन-दोन तासांचा बंद करण्याबाबत वाहतूक पोलिसांसोबतही पर्यायांची चाचपणी करून नियोजन करण्यात येत असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी सांगितले.