नवी दिल्ली – “आयसीआयसीआय’ बॅंकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांची आज सक्तवसुली संचलनालयाने सलग तिसऱ्या दिवशी कसून चौकशी केली. आयसीआयसीआय – व्हिडीओकॉन कर्ज गैरव्यवहार प्रकरणी ही चौकशी करण्यात येत आहे. आयसीआयसीआय बॅंकेकडून व्हिडीओकॉन समूहाला 2009 मध्ये देण्यात आलेल्या 1,875 कोटी रुपयांच्या कर्ज मंजूरीमधील अनियमिता आणि भ्रष्टाचार प्रकरणी कोचर दाम्पत्याचा जबाब “ईडी’कडून नोंदवून घेतला जात आहे.
सोमवारी या दाम्पत्याची पहिल्यांदा चौकशी करण्यात आली होती. मंगळवारी तब्बल 8 तास चौकशी करण्यात आली होती. मार्च महिन्यात “ईडी’ने या प्रकरणी कोचर दाम्पत्याशी संबंधित काही ठिकाणांवर छापेही घातले होते. त्यानंतर कोचर पती पत्नीला “ईडी’च्या मुंबईतल्या कार्यालयात चौकशीसाठी समन्स पाठवले गेले. दीपक कोचर यांचे बंधू राजीव कोचर यांची 30 एप्रिलपासून 2 मे पर्यंत “ईडी’कडून चौकशी केली गेली आहे.
राजीव कोचर यांनी या प्रकरणातील महत्वाची माहिती “ईडी’कडून दडवल्याचा आरोपही केला जात आहे. व्हिडीओकॉन समुहाचे प्रमोटर वेणुगोपाल धूत यांचीही याच प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे.