अणे – श्री कुलस्वामी खंडेरायाच्या श्रीक्षेत्र नळवणे (ता. जुन्नर) गडावर सोमवारी (दि. 2) चंपाषष्ठी महोत्सवानिमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
गडावर पहाटे 4 वाजता श्रींना मंगलस्नान आणि महाभिषेक करण्यात आला. सकाळी 8 ते 11 पालखी मिरवणूक सोहळा पारंपरिक वाद्याच्या गजरात काढण्यात आली. श्रींना नेवेद्य आणि आलेल्या भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते. दुपारी 12 वाजता जागरण, मराठमोळ्या गीतांचा कार्यक्रम झाला. रात्री 8 ते 10 हभप काजल महाराज रंधे यांच्या हरिकीर्तनानंतर गावातील विठ्ठल प्रासादिक भजनी मंडळाचे भजन झाले. रात्री 10 नंतर शोभेची दारू उडवण्याचा कार्यक्रम झाला.
श्री कुलस्वामिनी खंडेराया देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविकांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. आळेफाटा पोलिसांच्या वतीने बंदोबस्त ठेवला होता. पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर, माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, माजी आमदार शरद सोनवणे, शिवसेना जुन्नर तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, आंबेगाव शिवसेना तालुकाप्रमुख अरुण गिरे, अनंतराव गटकळ, धोंडीभाऊ पिंगट आदी मान्यवरांची उपस्थिती होती, अशी माहिती श्री देवस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब गगे यांनी दिली.