दुर्गसंवर्धनासाठी पुढाकार : शिवप्रेमी मोरया, जय मल्हार ढोल-ताशा पथकाचा “आव्वाज’
पवनानगर – शिवभक्तांचा बहुचर्चित फत्तेशिकस्त हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्याला शिवभक्त व इतिहास प्रेमी भरभरून प्रतिसाद देत आहेत. तसेच तो चित्रपट दुसऱ्यांनीही आवर्जून पहावा असेही सांगत असले तरी या चित्रपटातील शूटिंगसाठी वडगावातील मोरया ढोल-ताशा पथक व जय मल्हार पथक हे विनामूल्य सहकार्य करावयास तयार झाले. त्यातून मिळालेले मानधन पथकांकडून तिकोणा दुर्गसंवर्धन कार्याला देण्यात आले आहे.
फत्तेशिकस्त चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. तेव्हा चित्रपटातील शाहिस्तेखानाची फजिती झाल्यानंतर विजय उत्सव प्रसंगाचे गाणे चित्रित करायचे होते. त्या वेळी चित्रपटाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांना त्या प्रसंगात ढोल-ताशा पथकाची गरज होती. त्यांनी काही ढोल-ताशा पथकांस विचारणा केली होती. तेव्हा त्यांना पथक चालकांनी दोन लाख रुपये मानधन (सुपारी) मागितले होते.
त्यावर गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्थेचे पदाधिकारी गणेश जाधव यांना दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी चित्रपटाचे शूटिंगकरीता ढोल-ताशा पथकाची गरज आहे, असे सांगितले असता छत्रपती शिवाजी महाराज यांचा चित्रपट असल्याने आमच्या वडगावातील मोरया ढोल-ताशा पथक व जय मल्हार पथक हे विनामूल्य सहकार्य करावयास तयार झाले.
मे महिन्याच्या रणरणत्या उन्हात “रणी फडकते लाखो झेंडे…’ या चित्रपटाचे शूटिंग दोन दिवस सुरू होते. यामध्ये वडगाव मावळ मधील सुमारे 100 जणांनी मावळ्याच्या वेशात सहभाग घेतला होता.
गाण्याचे शूटिंग संपल्यावर दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी स्वखुशीने वडगावच्या ढोल-ताशा पथकास 30 हजार रुपये दिले. परंतु ही छत्रपती शिवराय यांच्या चित्रपटाचे वेळी मिळाल्याने ती रक्कम आमच्या वडगावकरांनी तिकोणागड दुर्गसंवर्धन कार्याला देऊ केली. असे छत्रपती शिवराय यांचे फत्तेशिकस्त चित्रपटात तिकोणागडाच्या सेवकांना मावळा म्हणून सहभाग मिळाला.