पणजी – तहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांची एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये महिलेचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपातून गोव्याच्या न्यायालयाने निर्दोष सुटका केली. त्यानंतर आता गोवा सरकारने मंगळवारी (25 मे) उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. गोवा सरकारला या प्रकरणी जवळपास 500 पानांची हार्ड कॉपी मिळाली. यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठासमोर या निर्णयाला आव्हान दिले आहे.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, गोवा सरकार न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध हायकोर्टात दाद मागेल. आम्ही गोव्यात महिलांविरोधात कोणताही अन्याय सहन करणार नाही. आम्ही जिल्हा न्यायालयाच्या या निर्णयाला लवकरच उच्च न्यायालयात आव्हान देऊ. सावंत यांनी स्वतः या प्रकरणात व्यक्तिगत लक्ष घालून उच्च न्यायालयात आव्हान देण्याबाबत निर्देश दिले. आपल्याकडे आरोपीविरुद्ध पुरेसे पुरावे असल्याचा दावा सावंत यांनी केला आहे.