काँग्रेसला नगरमध्ये संजीवनी देण्याचे बाळासाहेब थोरातांपुढे आव्हान

जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्षांसह पदाधिकारी निवडीपासून करावी लागणार पक्षबांधणीला सुरुवात

नगर: लोकसभा निवडणूक आणि निवडणूक निकालानंतर जिल्ह्यात कॉंग्रेस सुपडा साफच झाला आहे. पक्षांतर्गत वादामुळे अधीच अडचणीत असलेली कॉंग्रेस आता तर पूर्णपणे अस्तित्वहिन होण्याच्या मार्गावर आहे. माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी कॉंग्रेस सोडली नसली तरी ते कॉंग्रेसमध्ये नसल्यातच जमा आहे. त्यामुळे आता माजीमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर जिल्ह्याची जबाबदारी येऊन पडली असून जिल्ह्यात कॉंग्रेसला संजीवणी देण्याचे मोठे आव्हान आ. थोरात यांच्या समोर उभे ठाकले आहे.

आ. थोरातांना आता दक्षिणेसह उत्तरेलाही बळकटी देण्याचे काम करावे लागणार असून जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष निवडीपासून संघटना बांधणीचे कामे सुरू करावे लागणार आहे. अर्थात हे ओळखून आ. थोरातांनी लोकसभा निवडणुकीत प्रचार सभांच्या माध्यमातून कामाला सुरूवात केली आहे. या लोकसभा निवडणुकीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची सभा घेवून पक्षश्रेष्ठींचे पाठबळ देखील आ. थोरातांनी मिळाविले आहे.

या सभेला अनेक अडचणी आल्या तरी रात्री उशीरा का होईना ही सभा घेवून आ. थोरातांनी राज्यपातळीवर नाही तर राष्ट्रीयपातळीवरील आपल्या दबदबाची चुणूक दाखवून दिली आहे. त्यात राहुल गांधी यांनी संगमनेरला केलेला मुक्‍काम ही देखील आ. थोरातांसाठी जमेची बाजू ठरली आहे. परंतु आता आ. थोरातांना संगमनेरबरोबर संपूर्ण जिल्ह्यात पक्षबांधणी करावी लागणार आहे. विखेंसह त्यांचे समर्थक आता भाजपच्या वाटेवर आहेत. त्यामुळे जिल्हाध्यक्षपदासह सर्व तालुकाध्यक्षांची निवड करून नव्याने कार्यकारिणी तयार करण्याचे काम सुरुवातीला करावे लागणार आहे. हे सर्व करीत असतांना विधानसभा निवडणुकीची तयारी देखील करावी लागणार आहे. त्यासाठी इच्छुकांची चाचपणी करून त्यांना ताकद देण्याची भूमिका घ्यावी लागणार आहे.

जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या घडामोडीमुळे कॉंग्रेसची चांगलीच वाताहत झाली. अर्थात यापूर्वी जिल्ह्यात कॉंग्रेस तीन विधानसभा मतदारसंघापूरतीच मर्यादित होती. परंतु आता ती एका मतदारसंघापूरतीच राहिली आहे. दक्षिणेमध्ये श्रीगोंदा वगळता प्रभावी कॉंग्रेस नाही. पक्षांतर्गत विखे-थोरात संघर्ष नगर जिल्ह्याला नाही तर राज्याला सर्वश्रृत आहे. या दोघांच्या संघर्षामुळे पक्षाची वाढ तर झाली नाही. पण तशी फारशी घट देखील नाही. दोन्ही नेते राज्यपातळीवरील राजकारणासह जिल्ह्यात शह कटशहासह जिरवाजिरवीचे राजकारण करीत आले. त्यामुळे कार्यकर्त्यांना फारशी संधी मिळाली नाही. नव्याने पक्षात येणाऱ्यांना नेमके कोणाकडे जावे, असा प्रश्‍न पडत असल्याने तेही या संघर्षामुळे पक्ष प्रवेश करण्यास धजावत नव्हते. परंतू आता विखेंनी कॉंग्रेस सोडल्यानंतर थोरातांवर संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी पडली आहे.

आज नगर शहर, शेवगाव, पाथर्डी, पारनेर, राहाता, कोपरगाव, नेवासा, नगर, कर्जत, जामखेड, या दहा तालुक्‍यात बोटावर मोजता येईल एवढेच कॉंग्रेसचे कार्यकर्ते राहिले आहेत. श्रीगोंदा, अकोले, श्रीरामपूर या तालुक्‍यात काय ती थोडी कॉंग्रेस प्रभावी दिसत आहे. या सर्व परिस्थितीचा विचार केला तर आ. थोरातांना जिल्ह्यात कॉंग्रेस वाढीसाठी वेळ द्यावा लागणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाचे दोन ते तीन आमदार निवडून आले तर कॉंग्रेसला संजीवणी मिळेल. परंतु आ. थोरातांना आजवर पक्षांतर्गत संघर्ष करावा लागला. पण आता विरोधी पक्षांबरोबर संघर्ष करावा लागणार आहे. त्यात सत्ताधारी भाजप व शिवसेना असा हा संघर्ष करतांना कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना अंतर पडणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे. जिल्ह्यात सध्या तरी आ. थोरात यांच्याशिवाय दुसरा कोणताही नेता नाही की जो पक्ष सावरू शकेल. त्यामुळे त्यांना आता पुढाकार द्यावा लागणार आहे. अर्थात थोरात यांच्याकडे राज्यपातळीवरील जबाबदारी देखील पडण्याची शक्‍यत आहे. त्यामुळे राज्यसह जिल्ह्याला उभारणी देण्याची कसरत आता त्यांना करावी लागणार असल्याचे दिसत आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.