केंद्रात पूर्ण बहुमताचे स्थिर सरकार येणार हे निश्चित झाले आहे. शेअर बाजाराला अपेक्षित असणाऱ्या अनेक सकारात्मक बाबींपैकी ही एक महत्त्वाची गोष्टी आहे.
देशाने भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) बाजूने निर्णयाक कौल दिला आहे. त्यामुळे मुंबई शेअर निर्देशांक (बीएसई) आणि निफ्टी रोज नवे उच्चांक गाठत आहेत. मुंबई शेअर निर्देशांकाने प्रथमच ४०,००० हजारांचा टप्पा पार करून दिवसभरात ४०,१२४ अंशांना स्पर्श केला. निफ्टीने १२,००० चा टप्पा पार करून १२,०४१ अंशांना स्पर्श केला. पुढील काही आठवडे बाजारात असेच वातावरण राहिल. अर्थात निवडणूक निकालाच्या दिवशी थोडीफार नफेखोरी दिसली.
आर्थिक सुधारणा आणि धोरणात्मक कार्यक्रमांच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने स्थिर आणि पूर्ण बहुमतातील सरकार महत्त्वाचे ठरते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावेळी भारतीय जनता पार्टीच्या जाहीरनाम्यात कुठेही लोकप्रिय योजना किंवा अव्यवहार्य आश्वासनांची भरती नाही. त्यामुळे गेल्या पाच वर्षाप्रमाणे आगामी काळातही गृहनिर्माण, आरोग्य, सर्वांना शिक्षण, मेक इन इंडिया, मुद्रा योजना आणि शेतकऱ्यांना विविध अनुदाने यावरच भर असेल. पायाभूत सुविधांचा विचार केला तर पुढील पाच वर्षात १०० लाख कोटी रुपये गुंतवणूक करण्याचे उद्द्ष्ट असल्याचे जाहीरनाम्यात म्हटले आहे. त्यामुळे बँका, सिमेंट, दैनंदिन गरजेच्या वस्तू, बांधकाम आणि पायाभूत सुविधा क्षेत्रांची पुढील काही वर्षात चांगली कामगिरी राहिल.
त्यामुळे शेअर बाजारात नवा प्रवास सुरु करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी चांगले वातावरण आहे. मागील सरकारलाच नव्याने जनादेश मिळाला आहे. त्यामुळे आधीचाच सुधारणा कार्यक्रम आणि धोरणात्मक बाबी पुढे सुरु राहतील. गेल्या पाच वर्षात झालेल्या विकासकामांची फळे येणाऱ्या पाच वर्षात दिसू लागतील. अर्थव्यवस्थेची वाढ स्थिर राहिल अशा अपेक्षा आहेत आणि ती गोष्ट शेअर बाजारासाठी अनुकूल असेल.
गेल्या चार वर्षातील संथ वाटचालीनंतर २०२० या आर्थिक वर्षात कंपन्यांच्या अर्निंगमध्ये सुधारणा होण्याची चिन्हे आहेत. त्याचबरोबर नव्या गुंतवणूकदारांनी मार्केटमधील करेक्शनच्या संधी लक्षात घेऊन गुंतवणुकीचे धोरण ठरवण्याची गरज आहे. त्यानुसार दीर्घकालिन गुंतवणूक म्हणून आयसीआयसीआय बँक, टायटन कंपनी, अल्ट्राटेक सिमेंट, एल अँड टी, सिमेन्स लिमिटेड या कंपन्यांचा गुंतवणूदार विचार करू शकतात.
– चतुर