नवी दिल्ली – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना झेड दर्जाची सुरक्षाव्यवस्था पुरवण्यात येणार आहे. राणे यांच्या सुरक्षेला धोका असल्याचे कारण देत केंद्र सरकारने ते पाऊल उचलले.
राणे यांना याआधी वाय दर्जाचे व्हीआयपी सुरक्षा कवच होते.
आता त्यांच्या सुरक्षाव्यवस्थेचा दर्जा वाढवण्यात आला आहे. त्यामुळे राणे यांच्या सुरक्षेसाठी सहा ते सात सशस्त्र कमांडोंचे पथक तैनात असेल. ते कमांडो केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) सेवेतील असतील.
केंद्रीय यंत्रणांच्या शिफारसीनंतर राणे यांच्या सुरक्षाव्यवस्थेचा दर्जा वाढवण्यात आला. सीआयएसएफकडून अनेक अति महत्वाच्या व्यक्तींना (व्हीआयपी) सुरक्षा पुरवली जाते. त्यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि सरसंघचालक मोहन भागवत यांचाही समावेश आहे.