“केंद्र सरकार देशाला करोनाच्या दरीत ढकलतेय”

नाना पटोले यांची पुन्हा एकदा गंभीर टीका

मुंबई –18 वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणाला परवानगी नाकारून केंद्र सरकार देशाला करोनाच्या खाईत ढकलत आहे, असा घणाघाती आरोप महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला. ते म्हणाले, महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येने रौद्ररुप धारण केले आहे. देशात दररोज 1 लाखांपेक्षा जास्त लोकांना करोनाची बाधा होत आहे.

वाढत्या संक्रमणाला आळा घालण्यासाठी लसीकरणाशिवाय पर्याय नाही हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच कॉंग्रेस पक्षाने कोरोना लसीकरणासाठी वयोमर्यादेची अट शिथील करून राज्यातील 18 वर्षावरील सर्वांना लस देण्याची मागणी केली होती. देशातील डॉक्‍टरांची सर्वात मोठी संघटना इंडियन मेडिकल असोसिएशननेही पंतप्रधानांना पत्र लिहून हीच मागणी केली. पण केंद्र सरकरने ही मागणी अमान्य केली.

नाना पटोले म्हणाले, केंद्र सरकारच्या आडमुठ्या आणि लस सार्वत्रिकरणास अडवणूकीच्या धोरणामुळे देशातील केवळ 3 राज्येच लोकसंख्येच्या फक्त 5 टक्के लसीकरणापर्यंत पोहचली आहेत. हा अतिशय गंभीर आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने घातक प्रकार आहे. आत्तापर्यंत केवळ 8.30 कोटी लोकांनाच लस देण्यात आली आहे.

सर्वांना लस न देता प्राधान्य गटांनाच लस देण्याची केंद्र सरकारची भूमिका शास्त्रीय नाही. ज्यांना पाहिजे असेल, ज्यांची इच्छा आहे त्याला लस दिली पाहिजे. करोनाची लस खासगी हॉस्पिटलसह सर्वत्र मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिली पाहिजे. अमेरिकेसह इतर देशांनीही 18 वर्षांवरील सर्वांना लस देणे सुरु केले आहे. परंतु केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारला त्याचे गांभीर्य नाही.

नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने तरुण मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत असल्याने करोना संसर्ग होण्याचे प्रमाण याच वयोगटात जास्त दिसून आले आहे. त्यांना लसीची गरज सर्वात जास्त आहे. हा कोविड स्प्रेडींग गट कमी करून समाजाची हर्ड इम्युनिटी तयार करायची असेल तर कमीतकमी 60 टक्के लसीकरण केले पाहिजे.

इंडियन मेडिकल असोशिएशनेही 18 वर्षांवरील सर्वांना लस देण्याची भूमिका घेतली आहे, परंतु निती आयोगाची भूमिका मात्र याला पोषक नाही. इस्राईलसह जगातील अनेक देशांनी 18 वर्षांवरील सर्वांना लसीकरणाचे सूत्र स्विकारलेले आहे. मात्र भारत सरकारच त्यावर निर्णय घेणे टाळून तरुणाईला कोविडच्या गर्तेत ढकलण्याचे काम करत आहे, असेही पटोले यांनी म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.