राज्यात उष्णतेची लाट; ‘या’ भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्‍यता

उकाड्याने नागरिक हैराण

मुंबई – राज्यातील तापमानात दिवसेंदिवस बदल होताना दिसत आहेत. राज्यातील विविध भागांत तापमानात वाढ झाल्याने उष्णतेची लाट येत आहे. यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत.

तर आता राज्यातील काही भागांत मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडासह विदर्भातील काही भागात पावसाची शक्‍यता आहे.

विदर्भाच्या तुरळक भागात उष्णतेची लाट पहायला मिळत आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. मात्र, आता हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवला आहे. 

मुंबईच्या प्रादेशिक हवामान विभागाच्या के. एस. होसळीकर यांनी ट्विट करत माहिती दिली की, येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याची शक्‍यता आहे.

काही दिवसांपूर्वी राज्यातील विविध भागांत काही दिवसांपूर्वी तापमानात घट होऊन अवकाळी पाऊस पडला होता. अवकाळी पावसामुळे फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यात आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्याने बळीराजाची चिंता आणखी वाढली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.