पुणे – देशातील सिमेंट कंपन्यांचा नफा प्रतीवर्ष चार टक्क्यांनी वाढत आहे. सिमेंट उत्पादक कंपन्यांच्या वाढत्या स्पर्धेतून पावसाळ्यात नेहमीप्रमाणे सिमेंटचे दर काहीसे कमी होतील, अशी शक्यता असताना जून ते ऑगस्ट गेल्या तीन महिन्यांत सिमेंट दरात कोणतीही वाढ झालेली नाही. सध्या, सिमेंटचे उत्पादन चांगले होत असून पुणे स्टेशन, फुरसुंगी मालधक्यावर आवकही वेळेवर होत आहे. यामुळे पुरवठा साखळीही सुरळीत आहे. ओपीसी 53 ग्रेड गोणीचा दर 380 रुपये प्रति बॅग तर पीपीसी ग्रेडचा दर 355 असा आहे, अशी माहिती हडपसर येथील सिमेंट वितरकांनी दिली.
देशांतर्गत महागाई वाढत असताना याचा परिणाम बांधकाम साहित्य बाजारपेठेवर त्यातही सिमेंटच्या किंमतीवर होऊन दरवाढ होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. परंतु, जून ते ऑगस्ट या तिन महिन्यांत सिमेंट दरामध्ये फारसा चढउतार झालेला नाही. याउलट सिमेंटच्या किंमती स्थिर राहिल्याने त्याचा लाभ बांधकाम क्षेत्राला होत आहे. आंतराष्ट्रीय बाजारपेठांत कोळशाच्या वाढणाऱ्या किंमती तसेच रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाला होता. परंतु, 2023च्या सुरुवातीपासूनच सिमेंटचे दर स्थिर होऊ लागले.
सिमेंट ग्रेडबाबत…
बांधकाम बाजारपेठेत सध्या चांगली उलाढाल होत असताना सिमेंटच्या दोन्ही ग्रेडला चांगली मागणी आहे. ओपीसी 53: या ग्रेडचे सिमेंट स्लॅप, कॉलम, फुटींग अशा कामांना वापरले जाते तर पीपीसी : ग्रेडचे सिमेंट विट बांधकाम, भिंतींचे प्लॅस्टर अशा कामांना वापरले जाते. पुणे जिल्ह्यास शहर तसेच उपनगरांत नवी बांधकामांचे प्रमाण चांगले असल्याने या दोन्ही ग्रेडच्या सिमेंटला चांगला उठाव असल्याचे वितरकांनी सांगितले.