शेवगावात सीसीआय कापूस खरेदी केंद्र सुरू होणार

प्रातिनिधिक छायाचित्र

शेवगाव – येत्या 20 नोव्हेंबरपर्यंत शेवगाव येथे सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र सुरू होणार असल्याची माहिती स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब फटांगडे यांनी दिली. आज बाजारात खाजगी व्यापारी 3300 ते 4000 रुपये प्रतिक्विंटल होणारी खरेदी आता 5400 ते 5500 रूपये या हमीभावाने होणार असल्याने शेतकऱ्यांच्या पदरी दोन पैसे अधिक मिळणार आहेत.

अत्यल्प पाऊस व नंतर झालेली अतिवृष्टी यामुळे कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अगदी बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने ओढवून घेतला आहे. आता कुठे जेमतेम कापूस आहे, तोसुद्धा वेचणीसाठी शेतकऱ्यांना मोठी समस्या निर्माण झाली आहे. दरवर्षी साधारणपणे पाच ते सहा रुपये किलो दराने कापूस वेचणी होत होती. मात्र सततच्या पावसाने एकाच वेळी सर्व कापूस वेचणीसाठी आल्यामुळे, मजुरानेसुद्धा आपला भाव दुप्पट केला आहे. आज दहा ते बारा रुपये किलोप्रमाणे वेचणीसाठी शेतकऱ्यांना मोजावे लागत आहेत. त्यातच स्थानिक व्यापारी कवडीमोल किमतीने कापूस विकत घेत असून, या व्यापाऱ्यांकडे वजन मापाची हमी नाही तसेच ना पैशाची हमी असे चित्र आहे यामुळे शेतकऱ्यांची मोठी आर्थिक फसवणूक होते.

हमीभाव कापूस खरेदी केंद्र तातडीने चालू करावे अशी मागणी गेल्या एक महिन्यापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सहाय्यक उपनिबंधक शेवगाव यांच्याकडे लावून धरली होती. त्याचा पाठपुरावा करून संघटनेने अखेर दि. 20 नोव्हेंबरपर्यंत सीसीआय केंद्र शेवगावच्या हनुमान जिनींग प्रेसिंग याठिकाणी सुरू करण्यात येवून, कापूस खरेदीला सुरुवात होणार आहे, त्यामुळे शेवगाव सह तालुक्‍यातील सर्व शेतकरी बांधवांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे की बाहेरील खासगी व्यापाऱ्यांना कापूस देऊ नये, कमी भावात शेतकऱ्यांनी आपला कापूस विकू नये.

सध्या स्थानिक बाजारपेठेमध्ये व्यापारी 3300 ते 4000 रू दराने कापूस घेत आहेत परंतु सीसीआय चालू झाल्यास शेतकऱ्यांना 5450 व 5550 रुपये असा कापसाच्या प्रतवारीनुसार दर मिळणार आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब फटांगडे, संतोष गायकवाड, दत्तात्रय फुंदे, प्रवीण म्हस्के, संदीप मोटकर, दादासाहेब पाचरणे, अमोल देवढे, भोसले मेजर, प्रशांत भराट आदी कार्यकर्ते केंद्र सुरू व्हावे म्हणून सातत्याने प्रयत्नशील होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)