सातारा – सातारा शहरातील खड्डेमय रस्त्यांची दुरूस्ती अखेर बुधवारपासून सुरू झाली. आठवडाभर कागदी घोडे नाचवल्यानंतर सातारा पालिकेने बोगदा परिसरातून पॅचिंगच्या कामाला सुरवात केली आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांसह एकूण 11 सेवा रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येणार आहे.
अतिवृष्टीने साताऱ्यात प्रमुख तीन रस्त्यांसह इतर जोडरस्त्यांची अक्षरशः वाट लागली होती. माजी खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी रस्ते दुरूस्तीच्या सूचना दिल्यानंतरही पालिकेने प्रत्यक्ष काम सुरू करायला आठ दिवसांचा कालावधी घेतला. काही ठेकेदारांची जुनी अडकलेली बिले, रस्ते दुरूस्तीच्या धोरणात्मक निर्णयाची अडचणं, मुख्यत्वे मुख्याधिकाऱ्यांचे दुर्लक्ष या सर्वच कारणांमुळे सातारा शहरात पॅचिंगच्या कामाला सुरवात झाली नव्हती.
सातारा विकास आघाडीच्या पार्टी मिटिंगमध्येही रस्ते दुरुस्तीवर बराच गोंधळ झाला त्यात मुख्याधिकारी शंकर गोरे गेल्या शुक्रवारी विशेष सभेतून उठून जायचे निमित्त झाले. या सर्व घटनांचा राजकीय ताण निघायचाच होता. उदयनराजे भोसले यांनी मुख्याधिकारी शंकर गोरे यांना पाचारण करून कानपिचक्या दिल्यानंतर पालिकेची यंत्रणा हडबडली. तातडीने मुख्याधिकाऱ्यांनी जुन्या बिलांची देणी मार्गी लावत बांधकाम विभागाला लगोलग कामाला जुंपले. बुधवारी सकाळी बोगदा ते शाहू चौक या रस्त्याचे पॅचिंग प्राधान्यक्रमाने हाती घेण्यात आले. या पॅचिंगच्या कामावर चार अभियंत्यांचे पथक बारकाईने लक्ष ठेवणार आहे.
यानंतर मोती चौक ते राधिका चौक, राधिका चौक ते कृषी उत्पन्न बाजार समिती कॉर्नर, सेंट पॉल स्कूल ते मुथा चौक, हुतात्मा उदयान चौक ते पारंगे चौक हे चार रस्ते टप्पाटप्प्याने पॅचिंग करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी गोरे यांनी स्पष्ट केले. या पॅचिंगच्या कामांसाठी तीस लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यात पोवई नाका ते पोलीस मुख्यालय हा रस्ता दुरूस्तीसाठी हाती घेण्यात येणार आहे. त्यानंतर 11 सेवा रस्त्यांच्या दुरुस्तीचे नियोजन आहे. मात्र, वार्षिक दराच्या संदर्भाने अद्याप निर्णय न झाल्याने ठेकेदारांनी कामाचा हात आवळल्याची चर्चा आहे.