कोलकाता – तृणमुल कॉंग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांचे संसद सदस्यत्व रद्द करण्याच्या हालचाली सुरू आहेत, पण त्यांचे सदस्यत्व रद्द केले तर महुआंना सन 2024 च्या निवडणुकीत लाभच होईल आणि त्या पुन्हा निवडून येतील, असे तृणमुल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.
महुआ मोईत्रा प्रकरणात त्यांनी प्रथमच जाहीर भाष्य करीत त्यांची पाठराखण केली आहे. मोईत्रा यांनी संसदेत प्रश्न विचारण्यासाठी आपल्याच एका मित्राकडून अर्थिक मदत स्वीकारल्याचा आरोप असून त्या प्रकरणात सध्या त्यांची चौकशी सुरू आहे. मोईत्रांचे सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस संबंधीत समितीने केली आहे. त्यानंतर पक्षाने त्यांना नदिया जिल्ह्यात संघटनेची महत्वाची जबाबदारी सोपली होती. त्याद्वारे महुआ यांना पक्षाने अंतर दिलेले नाही असे संकेत पक्षातर्फे देण्यात आले होते.
नेताजी स्टेडियमवर पक्षाच्या एका विशेष अधिवेशनात बोलताना ममतांनी महुआ मोईंत्रांची पाठराखण केली. त्या म्हणाल्या की महुआंचे सदस्यत्व रद्द केल्यास महुआ आत्तापर्यंत संसदेत जे बोलत होत्या त्या आता संसदेच्या बाहेर अधिक खुलेपणाने बोलतील. निवडणुका आता केवळ तीन महिन्यांवर आल्या आहेत. त्या आधी त्यांचे सदस्यत्व रद्द केले तर महुआंची लोकप्रियता आणखीनच वाढेल अशी टिप्पणीही त्यांनी केली.