अलिगढ,- अखिल भारत हिंदू महासभेच्या राष्ट्रीय सचिव पूजा शकुन पांडे यांच्यावर एका वादग्रस्त वक्तव्याबद्दल उत्तरप्रदेश पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पूजा पांडे यांनी राष्ट्रपतींना निवेदन सादर करून देशातील शुक्रवारच्या सामूहिक नमाजाला प्रतिबंध करावा, अशी मागणी केली आहे. या वादग्रस्त कृत्यानंतर त्यांच्यावर विविध कलमांखाली गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
5 जून रोजी पांडे यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. त्या संबंधात पत्रकारांशी बोलताना त्यांनी म्हटले आहे की, अशा प्रकारच्या साप्ताहिक नमाजामुळे देशातील शांततेला धोका निर्माण होतो. त्यामुळे त्यावर बंदी घातली गेली पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे.
या वक्तव्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होऊ शकते आणि मुस्लिमांच्या भावना भडकू शकतात, अशी शक्यता असल्याने पोलिसांनी त्यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल केला. दरम्यान आपण खरे बोलल्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर आपण खेद व्यक्त करतो असे पूजा पांडे यांनी म्हटले आहे.