सातारा – कराडमधील करोनाचा विळखा वाढतच असून वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात दाखल असणाऱ्या 10 वर्षांच्या मुलाचा रिपोर्ट गुरूवारी पॉझिटिव्ह आला. करोनाबाधित रुग्णाच्या निकट सहवासातील म्हणून हा मुलगा रुग्णालयात दाखल झाला होता. जिल्ह्यातील 126 संशयितांचे रिपोर्ट गुरूवारी निगेटिव्ह आले आहेत. तर जिल्ह्यातील विविध विलगीकरण कक्षांत 146 जणांना संशयित म्हणून दाखल करण्यात आले आहे.
कराडच्या वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील बाधित रुग्णाच्या निकट सहवासातील म्हणून दाखल असणाऱ्या एका 10 वर्षीय मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचे पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाने कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. सध्या जिल्ह्यात 44 करोनाबाधित असून त्यापैकी आठ जण करोनामुक्त होऊन रुग्णालयातून सोडले आहे. तर दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
साताऱ्यातील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयातील 15, कृष्णा मेडिकल कॉलेजमधील 72, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील 26 व कोरेगावच्या ग्रामीण रुग्णालयातील 12, फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील 1 अशा एकूण 126 संशयितांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाने कळविले आहे. क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात 30, कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये 47, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात 54, वाईच्या ग्रामीण रुग्णालयात 1 व कोरेगाव येथे 14 अशा एकूण 146 जणांना संशयित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात दाखल असणाऱ्या एका करोनाबाधित रुग्णाचा 14 दिवसानंतरचा दुसरा नमुना अशा एकूण 73 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली.