शेवगाव – तालुक्यातील चापडगाव येथे राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघांतर्गत दीर्घकाळ बंद असलेली हमी भाव कापूस खरेदी अखेर मंगळवारी दुपारपासून सुरू करण्यात आले. आज अखेर एक हजार 968 क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. तर सीसीआयला कापूस विकण्यासाठी उद्यापासून प्राथमिक नाव नोंदणी सुरू होत आहे. साधारणतः 4 मेला त्यांचीही कापूस खरेदी सुरु होणार असल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांची चिंता कमी झाली आहे. यासाठी शेवगाव बाजार समितीने पाठपुरावा केला होता.
करोनामुळे 19 मार्चला चापडगाव येथील खरेदी केंद्र अचानक बंद करण्यात आल्याने कापूस विक्रीसाठी वाहनांची रांगा लागल्या होत्या. कधी खरेदी केंद्र सुरू होणार याची प्रतीक्षा होती. बाजार समितीने प्रयत्न केल्यामुळे हे केंद्र सुरू झाले आहे. शेवगाव हे कपाशीबाबत महाराष्ट्राचा सेंदवा आहे. राज्यात असा लौकिक असणारा कापूस उत्पादक शेतकरी कपाशीचे सीसीआय व नाफेडचे कापूस हमीभाव खरेदी बंद असल्याने मोठ्या संकटात सापडला होता. 5 हजार 200 रुपये क्विंटल कापूस खरेदीचा हमीभाव असतांनाही शेतकऱ्यांना गरजेपोटी तीन ते सव्वातीन हजार रुपये क्विंटल भावाने खाजगी व्यवसायिकांना तो नाईलाजाने घालावा लागत होता.
गेल्यावर्षी तालुक्यात 42 हजार हेक्टर क्षेत्रात कपासीचे पीक होते. येथील 11 जिनिंग प्रेसिंग पैकी 6 प्रेसिंग सुरु होत्या. आजतागायत येथे 162 कोटी 47 लाख 86 हजार 154 रुपये किमतीच्या 3 लाख 39 हजार 870 क्विंटल कापसाची खरेदी झाली असली तरी आजही तालुक्यात किमान 60 ते 70 हजार क्विंटल कापूस शेतकऱ्याकडे पडून असल्याने नाफेडची व सीसीआयची कापूस हमी भाव खरेदी सुरु व्हावी अशी शेतकऱ्यांची मागणी होती. शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने सातत्याने पाठपुरावा केल्याने चापडगाव येथे महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ अंतर्गत खरेदी सुरू झाली आहे. माजी आमदार नरेंद्र पाटील व चंद्रशेखर घुले पाटील, माजी सभापती रामनाथ राजपुरे, बाजार समितीचे सभापती ऍड. अनिल मडके, सचिव अविनाश म्हस्के यांचे योगदान त्यासाठी कामी आले आहे.
शेवगावातील हनुमान जिनिंग, अन्नपूर्णा, मारुतरावजी घुले पाटील सहकारी जिनिंग प्रेसिग, रिद्धी सिद्धी, व दुर्गा जिनिंग-प्रेसिंग या पाच केंद्रावर सीसीआयद्वारे गेल्या नोव्हेंबरपासून ते फेब्रुवारीअखेर 68 कोटी 62 लाख 25 हजार 964 रुपये किमतीच्या एक लाख 27 हजार 203 क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. तर बालमटाकळीच्या साई कोटेक्स जिनिंग केंद्रावर सीसीसीआय अंतर्गतच दोन कोटी 21 लाख 190 रुपये किमतीचा 4 हजार 117 क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे.