Somalia – ‘एमव्ही लीला नॉरफोक’ या मालवाहू जहाजाचे सोमालियाच्या किनारपट्टीवर अपहरण करण्यात आले आहे. या जहाजाचे गुरुवारी रात्री उशिरा अपहरण करण्यात आले. त्यानंतर भारतीय नौदलाने त्या दिशेने एक युद्धनौका रवाना केली आहे. दरम्यान, अपहरण केलेल्या जहाजावरील दलाशी संवाद प्रस्थापित झाला आहे.
सोमालियाच्या किनार्याजवळ अपहरण करण्यात आलेल्या लायबेरियन ध्वजांकित जहाजावरील चालक दलात पंधरा भारतीयांचाही समावेश आहे. भारतीय नौदलाची विमानेही जहाजावर लक्ष ठेवून आहेत. जहाजाच्या अपहरणानंतर भारतीय नौदलाची युद्धनौका ‘आयएनएस चेन्नई’ शोध घेण्यासाठी जहाजाच्या दिशेने पुढे सरकत आहे.
नौदलाची विमाने हालचालींवर लक्ष ठेवून आहेत आणि आयएनएस चेन्नई मदत पुरवण्यासाठी रवाना झाली आहे. इतर यंत्रणांचीही मदत घेतली जात असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. भारतीय नौदलाने सांगितले की, आम्ही आंतरराष्ट्रीय भागीदार आणि मैत्रीपूर्ण परदेशी देशांसोबत या प्रदेशातील व्यापारी शिपिंगची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहोत.