#IPL2020 : करोनाच्या धोक्‍यात साजरा केला वॉर्नरचा वाढदिवस

हैदराबादच्या सेलिब्रेशनवर टीका

दुबई – सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर याचा वाढदिवस साजरा करताना संघाच्या खेळाडूंनी करोनाबाबतच्या नियमांना हरताळ फासले. त्यामुळे आता आयपीएल समिती काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे. 

दिल्ली कॅपिटल्सवर विजय मिळवल्यानंतर हैदराबादच्या खेळाडूंनी वॉर्नरचा वाढदिवस हॉटेलच्या लॉबीतच साजरा केला. त्याने केक कापल्यानंतर काही खेळाडूंनी वॉर्नरच्या चेहऱ्यावर केक फासला. तसेच त्याच्यासह डान्सही केला. ही सर्व घटना कॅमेऱ्यात दिसली. त्यावर क्रिकेटप्रेमींनी सोशल मीडियावर प्रचंड टीका केली आहे.

करोनाचा धोका अद्याप कायम असताना असे सोहळे आयोजित करणे योग्य आहे का, अशी विचारणा करत हैदराबादच्या खेळाडूंना ट्रोल करण्यात आले आहे. एकतर वॉर्नरचा वाढदिवस तसेच दिल्लीविरुद्धचा विजय असा दुहेरी आनंद साजरा करताना खेळाडूंनी परिस्थितीचे भान राखायला हवे होते, असेही ट्रोल करताना नमूद करण्यात आले.

करोनाच्या सावटाखाली आयपीएल स्पर्धा येथे सुरू आहे मग अशा वेळी असे वर्तन बरोबर आहे का, अशी विचारणाही केली जात असून याबाबत आता आयपीएल समिती व बीसीसीआय काय कारवाई करणार हेदेखील विचारण्यात आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.