मुख्य कार्यकारी अधिकारी अमितकुमार यांचे प्रादेशिक कामगार आयुक्तांना पत्र
पुणे – कॅन्टोन्मेंट बोर्डातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लवकरच सातवा वेतन आयोग लागू होण्याचा मार्ग खुला झाला आहे. प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी यांना डिसेंबरपासून सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबतचे पत्र नुकतेच बोर्ड प्रशासनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमितकुमार यांनी प्रादेशिक कामगार आयुक्तांना दिले आहे. त्यामुळे गेली अनेक वर्षांपासूनची मागणी आता पूर्ण होणार आहे.
केंद्र आणि राज्यसरकारच्या अधिकारी, कर्मचारी यांना 2016 साली सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. मात्र, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या प्रशासनात कार्यरत असलेले अधिकारी तसेच कर्मचारी यांना गेल्या चार वर्षांपासून हा वेतन आयोग लागू केलेला नाही. बोर्डाच्या अधिकारी, कर्मचारी यांनाही सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा, अशी मागणी सातत्याने केली जात होती. यासंदर्भात पुणे कॅन्टोन्मेंट कर्मचारी संघाचे अध्यक्ष किशोर संघलिया, सचिव धनंजय केदारी, विजय शिंदे, मंगल वाल्मिकी आणि इतर पदाधिकाऱ्यांनी बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित कुमार यांची भेट घेऊन हा वेतन आयोग लागू करण्याबाबत पत्रदेखील दिले होते.
यानंतर बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, कामगार आयुक्त आणि कर्मचारी संघाचे पदाधिकारी यांनी चर्चा केल्यानंतर बोर्डाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार नुकतेच मुख्य कार्यकारी अधिकारी अमितकुमार यांनी प्रादेशिक कामगार आयुक्तांना पत्रदिले असून, डिसेंबरच्या वेतनापासून हा वेतन आयोग लागू होणार आहे.